मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याचा जवळचा मित्र पॉल बार्टर याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पॉल बार्टर या ऑस्ट्रेलियन नागरिकाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. त्याबरोबरच पॉल बार्टरला त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले असून देश न सोडण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहे पॉल बार्टर -
पॉल बार्टर हा पेशाने वास्तु रचनाकार असून गेली आठ वर्ष तो मुंबईत राहत आहे. अभिनेता अर्जुन रामपाल सोबत त्याची जवळची मैत्री असल्याचे सांगितले जाते. अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅब्रियल डिमेट्रिवेज हिचा भाऊ एगिसीलाओस डिमेट्रिवेज याच्यासोबत पॉलचे व्हाट्सअप संभाषण न्यायालयामध्ये एनसीबी कडून सादर करण्यात आले होते. त्या दोघांच्या व्हाट्सअप संभाषणात अमली पदार्थांच्या संदर्भात चर्चा झाल्याचे एनसीबी वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र केवळ व्हाट्सअप संभाषण हे एनसीबी रिमांड साठी पुरेसे नसल्याचे मत नोंदवत न्यायालयाने पॉलला एक लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
याआधी एनसीबीने केली आहे कारवाई -
दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स सिंडिकेटचा तपास करताना याआधी एनसीबीकडून काही ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रियलची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर बॉलीवूड निर्माता फिरोज नाडियावाला आणि त्याच्या पत्नीला 10 ग्राम गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जिथे तिला पंधरा हजारांचा जामीन मंजूर झाला होता. यानंतर अर्जुन रामपाल याची सुद्धा 6 तास कसून चौकशी केली होती. या दरम्यान अर्जुन रामपाल याने अमली पदार्थांच्या संदर्भात आपला काही संबंध नसून त्याच्या घरात सापडलेल्या औषधांचे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन त्याने एनसीबीकडे सुपूर्त केले आहे.
हेही वाचा - अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी 'एनसीबी'चा छापा, प्रेयसीच्या भावाला आधीच अटक