मुंबई: मुंबईमध्ये विजेच्या बचतीचा एक अनोखा प्रयोग पाहायला मिळणार आहे. इतिहासात प्रथमच एसी लोकलचा एक डबा सौर उर्जेवर चालणार आहे ( solar energy coach in mumbai). हा लोकलचा डबा येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. जाणकारांचे या बाबतीत असे म्हणणे आहे की, पावसाळ्यात सौर उर्जेवर लोकल चालवणे अशक्य आहे. मात्र सामान्य लोकलसाठी सौर उर्जेचा त्वरित वापर करता येवू शकतो.
पश्चिम रेल्वे मार्गावर धावेल हा डबा: सौर उर्जेवर चालणारा डबा असणारी ही लोकल पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार आहे (solar energy coach western railway). या डब्यामधील सर्व पंखे, दिवे इत्यादी बाबी ह्या सौर उर्जेवरच चालणार आहेत. सेमी हाय स्पीड लोकल ट्रेन मध्ये सौर उर्जेचा वापर करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. यामध्ये अंडरस्ट्लेम मोटर सेटअप आहे. ट्रेनमधील ट्रॅक्शन उपकरणे ट्रेनच्या खाली चाकाजवळ हलवली जाणार आहेत. त्याच्यामुळे खाली अधिक जागा निर्माण होणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला की, एसी लोकलच्या या डब्यामध्ये सौर ऊर्जेचे पॅनल बसवले जातील. हे पॅनल सूर्याची ऊर्जा खेचून घेतील. हे वजनाने हलके असतात आणि त्यामधून ३.६ किलो वॅट वीज निर्माण होते. ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक खराबीच्या घटना वारंवार घडत असतात त्यामुळे डब्यातील विजेचे उपकरणे बंद पडतात. आता ते प्रकार कमी होणार आहेत. ओव्हर हेड वायर मधून जो विजपुरवठा आहे तो आता कमी प्रमाणात घेतला जाईल, त्यामुळे विजेची बचत होण्यास मदत होणार आहे. सध्या तरी ट्रेनच्या एकाच डब्यात हा प्रयोग केला जाणार आहे. येत्या आठवड्यात याची प्रायोगिक चाचणी केली जाईल आणि चाचणीनंतर सर्व डब्यांसाठी अशी व्यवस्था करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल''
जाणकारांचे या संदर्भातील मत: यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारत ने जाणकार तंत्रज्ञ उन्मेष बागवे यांच्याशी संवाद साधला. उन्मेष बागवे म्हणतात," आता उत्सुकता आहे ती अंडरस्ट्लंग मोटरसह लोकल ट्रेन कशी धावते हे पाहण्याची. बऱ्याचदा डब्यातील वायर कुठल्या तरी कारणामुळे खराब होते, तेव्हा डब्यांमध्ये वीज पुरवठा होत नाही. त्यावेळी सौरऊर्जेचा उपयोग होऊ शकतो. मुंबईमध्ये भरपूर पाऊस होतो त्यामुळे रुळावर पाणी साचलं जातं. त्यावेळेला नेमकं सौर ऊर्जेचा डबा कसा धावतोय हे पाहिलं पाहिजे. आत्ताच ठाम काही सांगता येणार नाही. खरं तर रेल्वेने आधी नॉन एसी लोकल करीता सौर उर्जेचा पर्याय अमलात आणावा. तज्ज्ञांना भीती आहे की अंडरस्लंग मोटर पाण्याने भरलेल्या ट्रॅकमध्ये बुडून ट्रेनच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो".