बदलापूर - 'राज्यभरात सर्वत्र दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी देणार', अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. परंतु, ही संकल्पना मुळात राष्ट्रवादी काँग्रेसने 2018 ला बदलापूर शहरात सुरू केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितले.
तसेच आमच्याकडे राष्ट्रवादीची सत्ता नसताना देखील 10 रुपयात उत्तम व पोटभर जेवण मिळत असून, शिवसेनेने ही प्रेरणा राष्ट्रवादीकडून घेतल्याचे ते म्हणाले. याचसोबत दामले यांनी उध्दव ठाकरे यांचे आभार मानून, सत्तेवर अवलंबून न राहता काम करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी झुणका-भाकरी केंद्रासारखं करू नका,असा टोलाही लगावला आहे.
हेही वाचा पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांची जेवण व राहण्याची व्यवस्था; जैन बांधवांची सामाजिक बांधिलकी
राष्ट्रवादीने 1 वर्षापूर्वीच बदलापूर शहरात 10 रुपयात उत्तम व दर्जेदार जेवण देण्याची संकल्पना राबवायला सुरुवात केल्याची माहिती दामले यांनी दिली. तसेच सत्तेत नसतानाही राष्ट्रवादीकडून 'ताई'ज किचन' नावाचा उपक्रम अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केला. यामुळे अशा उपक्रमांसाठी सत्ता नाही तर इच्छाशक्ती असावी लागते, असे दामले यांनी सांगितले. तसेच 1 रुपयात झुणका भाकर देण्याची संकल्पना ज्याप्रकारे विरून गेली, तशीच ही पण घोषणा हवेत विरू देऊ नका, असा टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीची 10 रुपयांत जेवण संकल्पना
कर्नाटकातील 'इंदिरा किचन ' योजनेच्या पार्श्वभूमिवर बदलापूरात ' ताई'ज किचन ' नामक योजनेला सुरुवात झाली. सामान्य, गरजू तसेच कामगार वर्गाला सकस व परिपूर्ण आहार मिळावा, असा या मागील हेतू आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम 22 जुलै 2018 सुरू झाला आहे.
प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर बदलापूरमध्ये हा उपक्रम राबविला गेला असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात ह्या संकल्पनेचा विस्तार करण्यात आला. या अभिनव उपक्रमांतर्गत वरण, भाजी,पोळी असे 10 रुपयांत जेवण देण्याची संकल्पना होती. यासाठी महिला बचत गटांकडून आहार खरेदी करण्यात येत असून, त्यामुळे महिला बचत गटांना रोजगार व सक्षमीकरणाची संधीही उपलब्ध झाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी 'यशस्विनी' अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांची चळवळ उभारली होती. या बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली. त्यांनी बदलापूर शहरात 10 रुपयांत जेवण उपलब्ध केले आहे.