मुंबई - राज्यभरात दोन दिवस परतीच्या मान्सूनने हाहाकार माजला. काही ठिकाणी ढगफुटी झाली तर, अनेक भागांत मुसळधार पावसाने सगळ्यांना झोडपलं. शहरं तुंबली तर अनेक गावांचा संपर्क तुटला. पश्चिम महाराष्ट्, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरीपेक्षा जास्त मान्सून झाला आहे. पण अतिरेक सुद्धा जीवाशी येतो. याची प्रचिती कालच्या पावसाने आली. या रिपोर्टमधून पुराने प्रभावित झालेल्या राज्यभरातील विविध भागांचा आढावा घेणार आहोत...
पश्चिम महाराष्ट्रातील शहरं तुंबली...तर शेतांना तळ्याचे स्वरुप
कोल्हापुरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भाताची शेती भूईसपाट झाली आहे. तर भुईमूगाच्या शेंगांना कोंब आल्याची परिस्थिती आहे. नव्याने लावलेला ऊस देखील वाया गेला. शेतात पाणी साचून राहिल्याने ऊस कुजण्याच्या मार्गावर आहे. करवीर तालुक्यात ऊस, सोयाबीन, भात, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, केळी आणि घेवडा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय.
साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यात नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून द्राक्ष व डाळींब बागांना लाखोंचा फटका बसला आहे. नदीपात्रातील कोल्हापूर टाईप बंधारे तुडुंब भरले आहेत. यामध्ये गहू, बाजरी, मका, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुणे जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी काढणीला आलेला बटाटा परतीच्या पावसाने चिखलात सडला आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे लागवड केलेला कांदाही वाहून गेला. काही ठिकाणी बराखीत पाणी शिरल्याने कांदा सडला आहे.
कोकणातील भातशेती आणि फळबागा जमीनदोस्त
अहोरात्र पडणाऱ्या पावसामुळे पनवेल व उरण तालुक्यातील भातशेती धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सद्यस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली होती. कापणीनंतर भात सुकवण्यासाठी घातल्यानंतर अवकाळी पावसाने तो भिजला. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीत कापलेला भात कणग्यात गोळा गेला. मात्र दोन ते तीन दिवस सलग भिजल्यामुळे पिकाला बुरशी लागल्याची भीतीही व्यक्त होत आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे, तांदुळवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे शेतात उभे भाताचे पीक आडवे झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 15 दिवसांत 385 गावांमधील 5 हजार 284 हेक्टर क्षेत्रावरील 10 हजार 491 शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य शासनाच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात भाताचे उत्पादन घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मराठवाड्यात सोयाबीन कुजले... तर झाडावरच कापसाला फुटले मोड
औरंगाबाद जिल्ह्यात दरवर्षी 700 मिलिमीटर पाऊस होतो. मात्र यावर्षी 924 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या 158 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील कापूस, मका, सोयाबीनसारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात यावर्षी पावसाची संततधार पाहायला मिळाली. त्यामुळे 11 धारणांपैकी 10 धरणे ओसंडून वाहात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी 6 लाख 67 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यात दोन पिकांचा सर्वाधिक समावेश होता कापूस आणि मका या दोन पिकांची पेरणी 85 टक्के इतकी आहे. त्यापैकी 60 टक्के कापूस तर, 25 टक्के मका पिकाचा समावेश आहे. तर, फळबागेत डाळिंब आणि मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मागील चार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे नांदेडच्या १६ तालुक्यांतील पाच लाख 63 हजार 72 शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये तीन लाख 61 हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या 'एनडीआरएफ'च्या निकषानुसार २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या नुकसानात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.