मुंबई - 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ( mumbai internation film festival ) रविवारी उद्घाटन झाले. हा चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी एक पर्वणी मानली जात आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात पहिल्यांदाच लहान मुलांसाठी विशेष डॉक्युमेंटरी व चित्रपटांचे सुद्धा स्पेशल स्क्रीनिंग त्यासोबतच स्पर्धा भरवण्यात आल्या ( Special Screening For Children In MIFF 2022 ) आहेत. याबाबत सेन्सॅर बोर्डाचे डायरेक्टर जनरल रवींद्र भाकर यांनी 'ईटिव्ही भारत'शी संवाद साधला आहे.
जगभरातील चित्रपट निर्माते सहभागी - यावेळी बोलताना भाकर म्हणाले की, "हा चित्रपट महोत्सव म्हणजे सर्व चित्रपट प्रेमींसाठी एक आंतरराष्ट्रीय पर्वणी आहे. इथं फक्त महाराष्ट्र आणि देशभरातून नाही तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध चित्रपट निर्मात्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. काही ऑस्कर विनिंग चित्रपट निर्माते सुद्धा या महोत्सवात सहभागी होतील. ज्यांना चित्रपट कळतो, चित्रपटाची भाषा कळते, अशा लोकांनी आवर्जून या महोत्सवाला भेट द्यावी. तिथे फक्त स्पेशल स्क्रीनिंग नाहीतर चित्रपट, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म यांच्या स्पर्धासुद्धा भरवण्यात आल्या आहेत."
400 चित्रपटांची मेजवानी - "या महोत्सवात जगभरातून एकूण साधारण 400 चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपट असतील, डॉक्युमेंटरी असतील किंवा शॉर्ट फिल्म असतील हे सर्व समाजाचा आरसा असतात. समाजात जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब यात उमटत असतं. अनेक चित्रपटांमुळे समाजप्रबोधन देखील झालं आहे आणि अजून देखील होत आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांनी देखील याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन समाज प्रबोधनाचा एक हिस्सा व्हावं," अशी अपेक्षा भाकर यांनी व्यक्त केली आहे.
पहिल्यांदाच लहान मुलांसाठी स्पेशल स्क्रीनिंग - "आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 18 वर्षाखालील मुलांसाठी अनेक वेळा चित्रपट, डॉक्युमेंटरीज यांचा स्पेशल स्क्रीनिंग अथवा स्पर्धा होत नव्हत्या. मात्र, आपण पहिल्यांदाच लहान मुलांसाठी स्पेशल काहीतरी तयार करून यामध्ये त्यांच्या चित्रपटांचे डॉक्युमेंटरी चे स्पेशल स्क्रीनिंग आणि स्पर्धा ठेवल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना देखील या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. अनुभवता येणार आहेत. याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच होऊ शकतो," असा विश्वास देखील भाकरे यांनी व्यक्त केला.