मुंबई - मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्नीच्या नावे कंपन्या स्थापन करून कोविडच्या काळात तब्बल सव्वा दोन कोटींची कंत्राटे मिळवली आहेत. याच कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. ते कामही निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने या बंगल्याचे काम हेरिटेज विभागाला देण्यात आले होते. पालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही कंत्राटे मिळवल्याने या प्रकरणाची चौकशी करून त्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच त्यांना देण्यात आलेली रक्कम वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- आरटीआयमधून प्रकार उघडकीस -
मुंबई महापालिकेच्या सेवेत सांताक्रूझ पूर्व येथील एच ईस्ट वार्डमध्ये शिपाई म्हणून काम करणारे रत्नेश भोसले यांनी आपल्या पत्नी रिया रत्नेश भोसले यांच्या नावे आरआर एंटरप्राइजेज ही कंपनी स्थापन केली आहे. तर डी वार्ड येथे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट विभागात शिपाई म्हणून काम करणारे अर्जुन नारले यांनी आपल्या पत्नी अपर्णा ए. नारले यांच्या नावे श्री एंटरप्राइजेज ही कंपनी स्थापन केली आहे. या दोघांना वॉर्डमधील स्पॉट कोटेशन पद्धतीने २०१९ ते २०२१ या कालावधी तब्बल सव्वा दोन कोटींची कंत्राटे देण्यात आली आहेत. आरआर एंटरप्राइजेजला ६५ लाख ३६ लाखांचे तर श्री एंटरप्राइजेजला १ कोटी ११ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांना कोविड -19 च्या कामासाठी चार चाकी व वाहने भाडेतत्त्ववार पुरवण्याचे काम देण्यात आले होते. कोविड सेंटरमध्ये साधन सामुग्री पुरवठा करणे, पल्स ऑक्सिमीटर, आर्सेनिक एल्बम टैबलेट, वाटर प्यूरीफायर तसेच डी वार्ड कार्यालयातील हाउसकीपिंग आदी कामे देण्यात आली होती. डी विभागात देण्यात आलेल्या कंत्राटा संदर्भात आरटीआयमध्ये माहिती मागवली असता हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती आरटीआई कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी दिली.
- चौकशीची मागणी -
मुंबई महापालिकेच्या नियमानुसार पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना तसेच निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींना पालिकेची कंत्राटे घेता येत नाहीत. आपल्या घरातल्या लोकांना लाभ देता येत नाही. त्यानंतरही या दोन कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या नावे कंत्राटे देण्यात आली आहेत. कंत्राटदार कंपनी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्याचा संपर्क क्रमांक एकच आहे. यावरून या कर्मचाऱ्यांना काही अधिकाऱयांनी कंत्राटे मिळण्यासाठी मदत केल्याचे उघड होत आहे. यासाठी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दौंडकर यांनी केली आहे.
- आयुक्तांच्या बंगल्याचेही निकृष्ट काम -
दोन शिपायांनी स्थापन केलेल्या कंपन्यांना मुंबई महापालिका आयुक्तांचा ऐतिहासिक असलेला मलबार हिल येथील बंगला दुरुस्ती आणि देसाखरेखीचे काम देण्यात आले होते. सध्याचे पालिका आयुक्त असलेले इकबाल सिंग चहल या बंगल्यात राहण्यास आले असता त्यात पावसाचे पाणी लिकेज होत असल्याचे समोर आले. यामुळे या बंगल्याचे काम या कंपन्यांकडून काढून हेरिटेज विभागाला काम देण्यात आले. त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही.
- व्हीजलंसद्वारे चौकशी करा -
या प्रकरणात पालिकेचे नियम धाब्यावर बसवून कंत्राट दिल्याचे दिसून येते. पालिकेत सेवेत असताना आपल्या घरातल्यांच्या नावे कंत्राटे मिळवणे हा गुन्हा आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी पालिकेच्या विजलंस विभागाद्वारे करावी अशी मागणी करणारे पत्र पालिका आयुक्तांना देणार आहे. या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली रक्कम पालिकेने वसूल करावी तसेच या प्रकारांत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करणार असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.