मुंबई - कुर्ल्यात पालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळील मेहताब इमारतीला भीषण आग लागली होती. यामध्येही इमारत जळून खाक झाली आहे. आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
कुर्ल्यात पालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळील मेहताब नावाची इमारत आहे. तळमजला अधिक दोन अशी ही 80 वर्षे जुनी इमारत होती. यात गॅस सिलेंडर फुटल्याने आग लागल्याची माहिती आहे. आगीत जवळपास सहा ते सात सिलेंडरच स्फोट झाले आहेत. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर आठ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचत दीड तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
आग लागल्यानंतर कुर्ला पश्चिम स्थानकाकडून एलबीएस रस्त्याला जाणारा आणि सांताक्रूझ बिकेसी जाणारा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांना पायी चालत स्टेशन गाठावे लागले तर आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली