मुंबई - खार वेस्ट गुरू गणेश्वर मार्ग येथील नॉथन व्हीला इमारतीच्या 4 थ्या मजल्यावर आज सकाळी 10.30 वाजता आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून ४ जणांची सुटका केली असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
नॉथन व्हीला इमारतीला आग - खार वेस्ट गुरू गणेश्वर मार्ग येथील नॉथन व्हीला इमारतीच्या 4 थ्या मजल्यावर आज सकाळी 10.30 वाजता आग लागली. तळ अधिक सात मजली ही इमारत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आग विझवत असतानाच आगीची तीव्रता वाढल्याने 10.52 वाजता ही आग लेव्हल 2 ची असल्याचे जाहीर करण्यात आले. घटनास्थळी 8 फायर इंजिन, 4 जंबो टँकर, 3 अँबुलन्स दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीमधून 4 जणांची सुटका केली आहे. दुपारी 1 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
माजी महापौरांनी घेतली धाव - खार पश्चिम येथील नाँथन व्हिला इमारतीला आग लागल्याची घटना समजताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सद्यस्थितीत आग पूर्णपणे आटोक्यात आली असल्याचे माजी महापौरांनी सांगितले.