मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राजा कुंद्रा या दोघांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार अनिवासी भारतीय असलेल्या सचिन जे जोशी या व्यक्तीने केली आहे. २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर तत्कालीन संचालक म्हणून राहिलेल्या शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या दोघांकडून पीडित अनिवासी भारतीयाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र सतयुग गोल्ड स्कीममध्ये आपली फसवणूक झाल्याचा आरोप सचिन जे जोशी यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यासह गणपती चौधरी, मोहम्मद सैफी यांच्यासोबत सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
काय लिहिले आहे तक्रारीत?
सतयुग गोल्ड स्कीमअंतर्गत २०१४ साली ५ वर्षाच्या गोल्ड स्कीमच्या माध्यमातून ग्राहकांना डिस्काउंट रेटवर सतयुग गोल्ड कार्ड देण्यात आले होते. याच्या माध्यमातून ग्राहकांना एका ठराविक सोन्याच्या दरावर गुंतवण्यात आलेल्या रकमेच्या बदल्यात ठराविक सोने दिले जाणार होते. तक्रारदार सचिन जोशी यांनी २०१४ मध्ये असलेल्या सोन्याच्या दारावर १८ लाख ५८ हजार गुंतवत १ किलो सोने विकत घेतले होते. आजच्या घडीला एक किलो सोन्याची किंमत ४४ लाखांपर्यंत जाते, मात्र ५ वर्षे पूर्ण झाल्यावर ज्या वेळी सचिन जोशी हे सतयुग गोल्ड प्रायवेट लिमिटेडच्या बिकेसी येथील कार्यालयाजवळ गेले असता त्यास टाळे लागले होते. यामुळे सचिन जोशी या अनिवासी भारतीयाने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.