मुंबई - कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबईतील पब, बार, रेस्टॉरंटवर मुंबई महापालिकेने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वरळीतील युनियन पबकडून नियमांचे उल्लंघन केल्याची मुंबई पालिकेने तक्रार दिल्यानंतर कोविड नियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, संबंधित पबला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच तात्पुरत्या स्वरुपात परवाना रद्द करण्यात आला आहे. वरळीसह मुंबईतील इतरही काही ठिकाणी नाईट क्लब, बार व पबवर पालिकेचा वॉच आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी वरवरा राव यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा
कारवाई तीव्र करणार -
मुंबईतील नाईट क्लब, बार, पबमध्ये गर्दी करून कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई केली जाते आहे. मात्र, तरीही पब, बार, नाईट क्लब चालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वरळीतील हा प्रकार समोर आल्यानंतर आणखी तीव्र कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा-मुंबईकरांना किंचितसा दिलासा; 855 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू
वरळी हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे. मात्र, या मतदार संघात नियम मोडून पब चालू कसे ठेवले जातात असा सवाल विचारत भाजप व मनसेकड़ून टीकेची झोड उठवण्यात आली. यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पबवर कारवाई केली जाईल, असे म्हटले होते.
अशी आहे मुंबईमधील कोरोनाची स्थिती-
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत कोरोनाचे 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेले चार दिवस मुंबईत एक हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यात आज किंचितशी घट झाली. आज 855 नवे रुग्ण आढळून आले असून, 876 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या आज अधिक आहे. तर, 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.