मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडील तपासाचे काम सीबीआयकडे देण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेला तपास व सीबीआय कशाप्रकारे आता तपास करत आहे , याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट...
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूच्या तपास प्रकरणाकडे राजकारण, मनोरंजन क्षेत्राचे तसेच सर्व चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. मृत्यूनंतर अडीच महिने उलटूनही अद्याप हत्या की आत्महत्या याचा अंतिम निष्कर्ष तपास यंत्रणेला काढता आलेला नाही.
![डीआरडीओ कार्यालय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-sushant-7201159_03092020113956_0309f_00591_753.jpg)
- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जूनला त्याच्या बांद्रा स्थित घरात आत्महत्या केल्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. यावेळेस मुंबई पोलिसांनी सुशांतसिंगच्या घरातून वापरत असलेली एक डायरी, 3 मोबाईल फोन व एक लॅपटॉप यासह इतर गोष्टी हस्तगत केलेल्या होत्या.
- सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पार्थिव शवविचेच्छदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या ठिकाणी कुपर रुग्णालयाच्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल दिला होता. या अहवालामध्ये सुशांतसिंहच्या अंगावर कुठल्याही जखमा डॉक्टरांना आढळून आलेल्या नव्हत्या.
- त्याने आत्महत्या केल्यानंतर समाज माध्यमांवर मोठा वाद निर्माण झाला होता. सुशांतसिंहची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप वेगवेगळ्या क्षेत्रातून झाला.
- मुंबई पोलिसांनी या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी बॉलिवूडमधील दिग्दर्शक महेश भट , निर्माता व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा याबरोबरच सुशांतच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या बहिणी, वडील , रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. याबरोबरच सुशांतसिंहचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि सुशांत सिंगचा नोकर नीरज व स्वयंपाकी केशव, चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर , सुशांतचा अकाउंटंट रजत मेवानी यांच्यासह तब्बल 56 जणांची चौकशी करून त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले.
- सुशांतसिंह संदर्भात आर्थिक फसवणूक झाली होती, असा आरोपही केला जात होता. यासाठी पोलिसांनी सुशांतसिंहच्या नावावर असलेल्या काही कंपन्यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तब्बल चार बँकांचे स्टेटमेंट घेऊन ते फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टला पाठवले होते. फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचीची पडताळणी केल्यानंतर हा अहवालसुद्धा मुंबई पोलिसांना प्राप्त झाला होता. यात आर्थिक व्यवहारात कुठलीही अफरातफर नसल्याचे समोर आले होते.
- सुशांतसिंहचा व्हिसेरा रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबलासुद्धा पाठविण्यात आला होता. मात्र हा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला. सुशांतसिंहच्या पोस्ट मार्टममध्ये आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये सुशांत सिंहच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. मात्र असे असले तरीही या संदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू ठेवण्यात आला होता.
- सुशांतसिंहच्या कुटुंबातील सदस्य प्रियांका तनवर, तिचे पती सिद्धार्थ तनवर व बहीण नीतू सिंग यांनी मुंबई पोलिसांना जवाब दिला होता. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटले होते, की सुशांतसिंह हा मानसिक दडपणाखाली असल्याचे आम्हाला 2013 पासूनच माहित होते.
- त्याने आत्महत्या केल्यानंतर त्यावेळेस त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणावरही संशय नसल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते. मात्र अचानक 25 जुलै रोजी सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी बिहार पोलिसांकडे सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
- यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत येऊन चौकशी करत होते. यावरही मोठा वाद निर्माण झाला. बिहार पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग कायद्यानुसार करावा, असे खुद्द मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी म्हटले होते.
- सुशांतसिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातून मागणी करण्यात येत होती. त्याला अनुसरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल झाली. सुशांतसिंह याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात काही अडचण असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने तपास वर्ग करण्याचे आदेश दिले होते. याबरोबरच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना मिळालेले पुरावे व त्यांनी घेतलेल्या एकूण व्यक्तींची स्टेटमेंट सीबीआयला द्यावेत, असे आदेश दिले होते.
- दिल्लीतून सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईत दाखल झाल्यानंतर तपासासाठी काही पथके तयार करण्यात आली आहेत. अभिनेत्याच्या घरी घडलेल्या घटनेचा रिक्रिएशन करून त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी एका पथकावर देण्यात आली होती. तर दुसरे पथक सुशांतसिंहच्या प्रकरणात मुंबई पोलिसांशी समन्वय साधून मुंबई पोलिसांकडून योग्य ती मदत घेण्याचे काम करणार आहे. तिसऱ्या पथकाकडे सुशांतसिंहच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहार तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर चौथे पथक हे मुंबईतील डीआरडीओ कार्यालयात बसून सुशांत सिंहच्या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करत आहे.
- गेल्या 13 दिवसांपासून सीबीआयचे पथक मुंबई चौकशी करत आहे. यासाठी एनसीबी अमली पदार्थांच्या संदर्भात तपास करीत आहे. ईडी ही आर्थिक प्रकरणांचा तपास करीत आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, शोभा चक्रवती यांच्यासह सिद्धार्थ पीठानी, नीरज, केशव, सॅम्युअल मिरांडा , दीपेश सावंत, श्रुती मोदी व जया शहा यांच्यासह वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे.
- सुशांतसिंहचे चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर व अकाउंटंट रजत मेवाणी यांचीसुद्धा चौकशी सीबीआयने केलेली आहे . सुशांतसिंहच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी सीबीआयच्या टिमकडून सायकॉलॉजिकल अॅटोप्सीची मदत घेतली जात आहे. मात्र एवढे सगळे करूनसुद्धा अजूनही सुशांतने आत्महत्या केली का याचा अंतिम निष्कर्ष सीबीआयला काढता आला नाही ? त्याची हत्या झाली ? किंवा हा अपघाती मृत्यू होता का? याचा तपासही सीबीआयला करता आलेला नाही. सुशांतसिंहच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा शोध सुद्धा सीबीआयच्या पथकाला घेता आलेला नाही.
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चार जणांना ताब्यात घेतले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणाचे अमली पदार्थांतचा संबध आहे का? याचा तपास करण्यासाठी ईडीडून देण्यात आलेले व्हाट्सअप चॅट एनसीबीला मिळाले आहे. त्यानंतर एनसीबीने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तपास करून या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यात करण , अब्बास , जैद विलंत्री , बासितब या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली आहे. जैद विलंत्री या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
- एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले, जैद हा आरोपी शौविक चक्रवर्तीचा संपर्कात होता. अमली पदार्थांच्या संदर्भात दोघांमध्ये व्हाट्सअपवर संभाषण झाले होते. मात्र अटक करण्यात आलेला आरोपीचा थेट संबंध रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्यासोबत होता का याबद्दलचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.
![गौरव आर्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-sushant-7201159_03092020113956_0309f_00591_240.jpg)
ईडीकडून गौरव आर्याची चौकशी--
ईडीकडून रिया चक्रवर्ती व कथित ड्रग डीलर गौरव आर्या यांच्यामधील व्हाट्सअप चॅट जाहीर झाले होते. यासंदर्भात ईडीकडून गौरव आर्या याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. सलग दोन दिवस चौकशी केल्यानंतर गौरव आर्या याने ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की रिया चक्रवर्तीला मी ओळखतो. सुशांतला मी कधी भेटलो नव्हतो किंवा त्याला ओळखतसुद्धा नव्हतो.