मुंबई - मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून, सोमवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. मुंबईतील खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसेच ज्या भागांमध्ये अधिक रुग्णसंख्या आढळत असल्यास तेथील आरोग्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करावे, अशीही सूचना दिली.
रस्त्यांवरील खड्डे बुजवा
रस्त्यांवर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे आणि आजारांची साथ यावरील करण्यात आलेल्या उपाययोजना या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी एक आढावा बैठक घेतली. यावेळी ९ एप्रिल २०२१ ते आजपर्यंत मुंबईतील रस्त्यांवर सुमारे ४० हजार खड्डे भरण्यात आले आहेत. तरीही मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे ३ हजार मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. टाळेबंदी शिथील केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक देखील वाढली आहे. तरीही कोणतीही कारणे ना देता रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत असे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - मुंबई : खड्डे पाहून महापौरांचा चढला पारा; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
अभियंत्यांना इतर काम नको
रस्त्यांवरील खड्डे भरताना त्यांचे योग्य मोजमाप करुन तातडीने भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती यंत्रणेकडे कोल्डमिक्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. काही विभागांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रस्ते अभियंत्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण आहे. शिवाय इतर कामकाजही त्यांना देण्यात आले आहे. मात्र, आता पुढील १ महिने रस्ते अभियंत्यांना इतर कोणतीही कामे न सोपवता प्राधान्याने रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल असेही अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
डास निर्मूलन करा
कीटक निर्मूलन अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आणि परिरक्षण अधिकारी यांनी संयुक्त कृती कार्यक्रम हाती घेऊन डास निर्मूलन करावे. आपापल्या भागांमधील अनुभवी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था यांची देखील मदत घ्यावी, असेही निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. तसेच सहायक आरोग्य अधिकारी (आरोग्य) यांनी दैनंदिन रुग्णांची आकडेवारी सहायक आयुक्तांना सादर करावी. सहायक आयुक्तांनी ज्या भागांमध्ये अधिक रुग्णसंख्या आढळत असेल,तेथील आरोग्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून जानेवारीपासून मुंबई महानगरात सुमारे ५८ हजार ठिकाणी डास निर्मूलन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून पडले बाहेर !