मुंबई - कॊरोनावरील फेविपीरावीर औषधांची मागणी वाढती असताना एकीकडे या औषधाचा काळाबाजार होतोय, तर दुसरीकडे बनावट औषधे विकत कॊरोनासारख्या महामारीच्या काळात रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए)कारवाईतून समोर आले आहे. कांदिवली, गोरेगाव आणि अन्य एका ठिकाणच्या औषध विक्रेत्यांविरोधात कारवाई करत दीड कोटीचा बनावट फेविपीरावीर आणि हायड्रॉकक्सि क्लोरोक्वीन औषधांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून विना परवाना या औषधांचे उत्पादन-विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे.
येथून जप्त केला साठा
एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला गोरेगाव आणि कांदिवली येथे कॊरोनावरील बनावट औषधांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 24 मे रोजी एफडीएने गोरेगावमधील शिवसृष्टी सर्जीमेड आणि कांदिवलीतील मेडिटेब वर्ल्डवाइल्ड तसेच निरव ट्रेडलिंक या तीन औषध दुकानांवर धाड टाकली. या धाडीत 1 कोटी 54 कोटींचा फेविपीरावीर आणि हायड्रोक्सि क्लोरोक्वीनचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे.
विना परवानगी विक्री
या बनावट औषधांची चौकशी केली असता विना परवानगी औषधांची विक्री-उत्पादन केले जात असल्याचे समोर आले. तर ज्या हिमाचल प्रदेशातील कंपनीकडून औषधाचे उत्पादन केल्याचे नमूद करण्यात आले होते, ती कंपनीच अस्तिवात नसल्याचे यावेळी समोर आले. तर नोएडातील ज्या कंपनीकडून विक्री केली जात होती त्या कंपनीकडे विक्री परवाना नसल्याचेही समोर आले. याप्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. तर या कंपनीची औषधे प्रतिबंधित करत देशातील सर्व राज्यांना यासंबंधीची माहिती आणि निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली; मंगळवारी 14 हजार 123 नवे बाधित