मुंबई: स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणात (sexual assault of minor girl) अटक करण्यात आलेल्या वडिलांची आज कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष POCSO कोर्टाने गेल्या सात वर्षापासून सुरू असलेल्या या खटल्यावर हा निकाल दिला. आरोपी विरोधात 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयातील विशेष POCSO न्यायाधीश कल्पना पाटील यांनी निकालात असे नमूद केले की पीडितेची आई आणि आरोपी वडिल यांच्यातील तणावपूर्ण संबंधातून अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांविरूद्ध बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार दाखल केली.
7 वर्षापूर्वीची आहे केस: अल्पवयीन पीडित मुलीने घडलेल्या घटनेबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या मदतीने 6 ऑक्टोबर 2015 रोजी तिच्या वडिलांविरुद्ध एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तीन दिवसांनी 9 ऑक्टोबर रोजी आरोपी वडिलांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तक्रारीनुसार अल्पवयीन मुलीने आरोप केला होता की तिचे वडील 2013 ते 2015 दरम्यान तिच्या खाजगी अंगाला जबरदस्तीने स्पर्श करत असत. पीडित मुलीने सांगितले होते की 22 जुलै 2014 रोजी आई कामासाठी बाहेर गेली असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा 11 सप्टेंबर 2015 रोजी सुद्धा अत्याचार केला होता.
पीडितेच्या साक्षीत आढळला विरोधाभास: आरोपी वडिलांविरोधातील बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्ष पीडित मुलगी, पीडित मुलीची आई आणि पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर यांच्या साक्षीवर विसंबून होते. मात्र तपासाअंती न्यायालयाच्या लक्षात आले की पीडित अल्पवयीन मुलीच्या साक्षीत विरोधाभास दिसत आहे. पीडित मुलीच्या आईच्या साक्षीवरून असे दिसून आले की मुलीच्या शैक्षणिक प्रगतीत लक्ष देण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी अल्पवयीन मुलीशी कठोरपणे वागत होता. तसेच आरोपीच्या स्वभावामुळे पत्नी देखील त्याच्या वागणुकीला कंटाळलेली होती असे निरीक्षण विशेष न्यायाधीश यांनी नोंदविले.
अल्पवयीन मुलीने खोटा गुन्हा दाखल केला: न्यायालयाने असेही म्हटले की पीडित मुलीने तिच्या वडिलांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लगेच पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला नाही, ही बाब पटण्यासारखी नाही. याउलट तिच्या शेजाऱ्यासोबत उपस्थित असलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेला जाणीव झाली की लैंगिक छळ किंवा बलात्काराच्या तक्रारीचा वापर केल्यास त्रासदायक व्यक्तीला आवर घालता येतो, त्यामुळे या मुलीने हा खोट गुन्हा दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपी वरील सर्व आरोप फेटाळून तब्बल सात वर्षानंतर या आरोपातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले.