मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडकला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नाशिकहुन मुंबईला पोहचला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.
लाँगमार्चमध्ये 15 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग-
अखिल भारतीय किसान सभेच्या लाॅंग मार्चमध्ये सहभागी झालेले शेतकरी मुंबईत पोहचले आहेत. जीप, ट्रॅक्टर अशा आपल्या वाहनांसोबत या मोर्चामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. २६ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या -
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.
सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा-
देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार महामुक्काम सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे. सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर राज भवनाकडे दिशेने रवाना होतील. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील. सोबतच प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून या मोर्चाची सांगता होणार आहे.
हेही वाचा- '...तर पेट्रोल पंप बाहेर ट्रॅक्टर जाम केला जाईल'; टिकैत यांचा इशारा
हेही वाचा- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातील कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद..