मुंबई - कोरोनाचे संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदाही गौरी गणपतीचे विसर्जन अगदी साध्या पध्दतीने करण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीवर 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जनाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 578 गणेश / गौरी मूर्तींचे विसर्जन झाले. सर्व 578 पैकी कृत्रिम तलावात 279 गणेश / गौरी मूर्त्यांचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार घडला नसल्याचेही मनापाने सांगितले आहे. एरवी रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी, गणेश नामघोषाने दणाणून जाणारा परिसरात मात्र, आज शांत स्वरूपात दिसून आला. केवळ गणपती बाप्पा मोरया या जयघोषात गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा
ढोल ताशांचा गजर, लेझीम आणि झांज पथकांचा झंकार, फुलांचा वर्षाव आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करीत दरवर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक निघायची. मुंबईत सर्वत्रच चैतन्याचे व उत्सहाचे वातावारण असायचे. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात येतो. शुक्रवारी गणरायाचे आगमन झाले. बाप्पाच्या चरणी भक्तजण लीन झाले होते. शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पांला निरोप दिल्यानंतर रविवारी मंगळागौरींचे आगमन झाले. मुसळधार पावसातही भक्तजणांनी मोठ्या हर्षोत्सहात गौराईचे स्वागत केले. माहेरवाशीन गौराईला गोडधोडाचा नैवैद्य दाखवून मनोभावे पूजा-अर्जा करण्यात आली. गेल्या पाच दिवसापासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर मंगळवारी भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
मुंबईतील गिरगाव चौपाटीसह सर्व चौपाट्या, तलावात गणेशाचे विसर्जन
मुंबईतील गिरगाव चौपाटीसह सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी दुपारी सुरुवात केली. जसा दिवस मावळत जाईल, तशी विसर्जन स्थळावर भाविकांची गर्दी होईल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषाने गणेश भक्त लाडक्या बाप्पाला साश्रुनयनांनी निरोप दिला. गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांना विसर्जनस्थळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दलाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सीसीटिव्ही कॅमरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नियोजनास भाविकाने केला सलाम
पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सर्वत्र सुरू आहे. मुंबईतील प्रमुख चौक पाटणपैकी एक असलेला जुहू चौपाटीवर आज पाचव्या दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होत आहे. दरम्यान, पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गणेश भक्तांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.