मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-305 वरील 51 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 36 जण बेपत्ता असल्याची माहिती नौदलाकडून दिली जात आहे. बार्ज पी-305 वरील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईतल्या येलो गेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे. आज(शुक्रवारी) सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक जे जे रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत. परंतु या ठिकाणी नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यासाठी यलो गेट पोलीस ठाण्यातील संबंधित ड्युटी ऑफिसर उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी यलो गेट पोलीस स्थानकाच्या विरोधात नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
ही घटना होऊन तब्बल दोन दिवस झाले तरी मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मृतदेह हे अजून मिळालेले नाहीत. ते सगळे मृतदेह जे जे रुग्णालयाच्या शवागृहात आहेत. मात्र, यातील काही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. असे असताना ज्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे, ते मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पार पाडण्याकरिता येलो गेट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जेजे रुग्णालयात हजरच झाले नाहीत. त्यामुळे संबंधित नातेवाईकांना त्या ठिकाणीच ताठकळत राहावे लागले. त्यामुळे या मृतांच्या नातेवाईंमध्ये यलो गेट पोलिसांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.
नौदलाकडून शोध आणि बचावकार्य सुरूच..
बार्ज पी-305 शोध आणि बचावकार्य सुरूच आहे. भारतीय नौदला कडून बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वाचवले आहे, त्यांना मुंबईत परत आणले आहे. आयएनएस कोलकाता आणि कोचीच्या सहाय्याने हे कर्मचारी मुंबई बंदरात सुखरूप परतले. यावेळी ४९ जणांचे मृतदेह देखील आणण्यात आले होते. दरम्यान उर्ववरीत ३८ बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आयएनएस कोची पुन्हा एकदा शोध आणि बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.
या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी-
दरम्यान हवामान विभागाने तौक्ते वादळाची पूर्वसूचना दिलेली असताना देखील या बार्जवरील कर्मचाऱ्यांना सुखरुपस्थळी का हलवण्यात आले नाही, याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केली आहे.