मुंबई - मुंबई आणि मुंबई पोलिसांविरोधात बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतची बाजू घेणारे ट्विट राज ठाकरे आणि त्यांच्या कुटूंबाच्या नावाने पडू लागल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडू लागली आहे. मात्र, हे ट्विट फेक अकाउंटवरून केले गेल्याचे समोर आले. अशा ट्विटवरून मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी या अकाउंट्सविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
राज ठाकरे यांच्या फेक ट्विटर अकाउंटवरून संजय राऊत यांना सुनावण्यात आले आहे. शिवाय, शर्मिला ठाकरे यांच्या फेक ट्विटर अकाउंटवरूनही 'कंगना मेरी बेटी है' असे ट्विट करण्यात आले आहे. या विरोधात मनसेने शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस व मुंबई शहराबाबत केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मुंबई कोणा बापजाद्यांची नसून ९ सप्टेंबरला मी मुंबईत येत आहे. कोणामध्ये दम आहे, मला अडवण्याचा मला बघायचेच आहे, असे खुले आव्हान कंगनाने दिले होते. अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यू प्रकरणावरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्यासारखी वाटत असल्याचे ट्विट केले होते. तसेच बरेच लोक आपल्याला मुंबईमध्ये परत न येण्याची धमकी देत असून मी मुंबईत येत आहे हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे ट्विट केले होते.