मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम केले आहे. जगभर महाविकास आघाडी सरकारच्या कामाची प्रशंसा केली जात आहे. मात्र हे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पचणी पडत नसल्याने, त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
कोरोनाबाबत गंभीरतेने राज्य सरकार काम करत आहे. कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आणि मृतांचा आकडा लपवला जात नाही. राज्यात ६ हजार २०० लॅब तयार करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारचे कौतुक केले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना पचत नसल्यामुळेच त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याची टीका मलिक यांनी केली आहे.
'विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारची बदनामी'
दरम्यान गुजरातमध्ये ७१ दिवसांत ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर येते आहे. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे. तिकडे लक्ष देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. फडणवीस यांना चांगले काम दिसत नसेल तर त्याला काही उपाय नाही, मात्र राज्यात महाविकास आघाडी चांगले काम करत आहे, ही सत्य परिस्थिती असल्यांचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - हळदीच्या कार्यक्रमात तुफान राडा, गवाकऱ्यांची फ्री स्टाइल हाणामारी