मुंबई - राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्र लिहिले असून, त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच देशभरातील अनेक राज्यांनी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केल्याचेही फडणवीसांनी म्हटले आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
'पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी'
सध्यास्थितीमध्ये 12 राज्यांनी प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दिला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारांच्या विविध संघटना या संदर्भात सातत्याने मागणी करत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाइनमाध्यमातून आंदोलन सुद्धा केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो, या दुसऱ्या लाटेत देखील अनेक पत्रकार दगावले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असून, त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा - 'तारक मेहता...'मधील 'टप्पू'च्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू