मुंबई - माझी मऱ्हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर अशा शब्दात मराठी भाषेची महती संपूर्ण जगामध्ये व्यक्त केलेली आहे. परंतु, तरीही मराठी भाषेला गेल्या आठ वर्षांपासून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. राज्याचे मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच केंद्रात मंत्री रेड्डी यांची भेट घेतली आहे. त्याचे नेमके काय झाले? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे घोडे कुठे अडकले? काय होणार आहे? या विषयी आपण जाणून घेणार आहोत देसाई ( Face to face interview minister Subhash Desai ) यांच्याकडून.
प्रश्न - सर काय झाले नेमके. गेल्या अनेक वर्षांपासून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. सर्व स्तरावरून करत आहे. तुम्ही जाऊन आलात काय परिस्थीती आहे.
सुभाष देसाई - दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री रेड्डी यांना भेटलो. त्यांनी जे उत्तर दिले होते आणि ते फार सकारात्मक होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, ते आम्ही तपासून बघितले, ते योग्य आहे. लवकरात लवकर विनंती केली की, आपण निर्णय घेतलेला आहे. मराठी भाषा सर्व निकष पूर्ण करते आणि अभिजात भाषेच्या दर्ज्यासाठी पूर्ण पात्र आहे. आपलाच विचार आणि निर्णय आहेत तर, मग 27 तारखेला कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन साजरा करतो त्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्यावेळी आपण घोषणा केली तर त्यामुळे आनंद होईल. शंभर टक्के आमची खात्री पटलेली आहे की, मराठी भाषा यासाठी अत्यंत योग्य आहे, त्यामुळे आम्ही आता ते लवकरात लवकर करू. घोषणा 27 व त्यापूर्वी होते त्याच्याकडे आमचे लक्ष लागलेले आहे. खरे तर, केंद्र सरकारने यासाठीचे निकष ठरवले ती सगळी पूर्ण होत आहे. दोन हजार वर्षांपूर्वीची ही भाषा होती. शिलालेख वगैरेंची चित्र आपण सगळी त्यांना दिली, आपली तज्ज्ञांची समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यांनी सविस्तर अहवाल दिला. साहित्य अकादमीने नेमलेल्या एक्सपर्ट कमिटीने हे सगळे तपासून बघून अनुकूल, असा अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळे आता फक्त केंद्राकडे हा निर्णय आहे आणि तो लवकरात लवकर जाहीर होईल, अशी अपेक्षा. शेवटी एकच म्हणावसे वाटते की, महाराष्ट्राला आपल्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच वाट पाहावी लागते.
प्रश्न - सातत्याने गेली आठ वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. आठ वर्षांमध्ये इतके सातत्याने पुरावे देऊन निकषाची पूर्तता करूनसुद्धा एवढा विलंब का लागतो? असे नेमके काय कारण आहे?
सुभाष देसाई - राजकारण असण्याचे काही कारण नाही. ठरवलेले नियम घालून दिले त्याची सगळी पूर्तता झाली आहे. त्यांनी अभिप्राय दिलेले अनुकूल आहे. स्वतः मंत्री १०० टक्के मराठीचा हक्क आम्हाला मान्य आहे, असे सांगत असताना तो लागू होईल, अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्राला नेहमीच काही मिळवायचे असेल तर, लढावे लागते. संघर्ष करावा लागतो. याबाबतीत ती वेळ येऊ नये, अशी अपेक्षा आहे.
प्रश्न - समजा असे झाले नाही. त्यांनी ही घोषणा केली नाही तर, महाराष्ट्रामध्ये मराठी अभिजन चळवळ सुरू करतील, अशा पद्धतीची परिस्थिती आहे, असे आपण म्हणता
सुभाष देसाई - महाराष्ट्रामध्ये याबद्दल प्रचंड असा उत्साह निर्माण झालेला आहे. एक तर मागच्या नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण लोकजागृती केली. एक लघुपट दाखवला. प्रदर्शन दाखवले. विधिमंडळात सुद्धा माहिती दिली. विधिमंडळाने ठराव केला आणि एवढे सगळे होऊन आता जनता या बाबतीत आग्रही असताना जर नाही झाले तर मला दोन बाजू दिसतात. घोषणा झाली तर १३ कोटी जनता सुखी होईल, आनंदी होईल. ही गोष्ट नाही झाली तर, ती जनता नाराज होईल आणि महाराष्ट्र नाराज झाल्यानंतर तो गप्प बसत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. आम्हाला कोणतीही कटुता न येता हा निर्णय व्हावा असे वाटते आणि म्हणून केंद्र सरकारला विनंती आहे. आम्ही प्रयत्नसुद्धा करत आहे की गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी जर हा निर्णय दिला तर, चांगल्या वातावरणामध्ये एक चांगली घटना होईल.
प्रश्न - या संदर्भामध्ये राज्य सरकार म्हणून मराठी भाषा जगावी, जतन व्हावी, यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत. कोणकोणत्या स्तरांवर आपण प्रयत्न करत आहेत?
सुभाष देसाई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, तिच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी राज्यसरकार आणि आमचा विभाग खूपच जाणीवेने प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी आपण एक कायदा केला की इतर बोर्डांच्या शाळेत किंवा इतर माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा हा एक विषय अनिवार्य केला आहे. कायदा असल्यामुळे मोडता येणार नाही. तो निर्णय घेतला. दुसरे आपल्याला मुंबई राजधानीमध्ये एक मराठी भाषा भवन व्हावे, अशी सर्व जनतेची अपेक्षा होती. नुकताच एक भुखंड मरीन ड्राइव्ह मुंबईच्या ठिकाणी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. त्याच्यावरती आराखडे मंजूर झालेले आणि त्या ठिकाणी सर्वांना अभिमान वाटेल असेच एक सांस्कृतिक दृष्ट्या श्रेष्ठ दर्जाचे मराठी भाषा भवन लवकरच उभे राहील.
प्रश्न - साहित्य संस्कृती महामंडळ असेल किंवा साहित्य अकादमी असेल किंवा मराठी विश्वकोश मंडळ यांचे काम तितकेसे समोर येताना दिसत नाही, प्रभावीपणे होत नाही. या संदर्भात काय सांगाल?
सुभाष देसाई - खरे तर मराठी भाषा विभागाने स्थापन केलेली सगळी मंडळे अत्यंत क्रियाशील आहेत. आता विश्वकोश निर्मिती मंडळाने त्यांच्यासमोर दिलेले काम होते ते पूर्ण केले आणि सगळे माहितीचे कोश हे प्रकाशित झाले. आता ते आम्ही ऑनलाईन सुद्धा आणले. नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल स्वरुपात आणावे लागतात. सगळे कोष अशा प्रकारे ऑनलाईन उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. साहित्य संस्कृती मंडळाने सुद्धा त्यांचे पुस्तक प्रकाशनाचे आहे ते काम सगळे केले. आमचे सगळे पुरस्कार हे वेळेवर जाहीर झाले. आता 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी साहित्यिक आणि सहा मान्यवर यांचा आम्ही गौरव करणार आहे. पण, हे सगळे निर्णय वेळच्यावेळी होत आहेत. मला एक समाधान आहे ते आपले सगळ्या मंडळांचे मान्यवर अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य अतिशय मनापासून आणि एकजुटीने काम करीत आहेत.
प्रश्न - अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचे दिसत आहे. जे काही वाचन असेल ते व्हॉट्सअॅपवर किंवा समाज माध्यमांवर व ते तिथली भाषा ही फारच वेगळ्या पद्धतीची दिसते तर हे सगळे नीट व्हावे किंवा भाषा याच्यासाठी समाज माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी काही वेगळे प्रयत्न प्रयोग चालू आहेत का?
सुभाष देसाई - समाजमाध्यम हा अलीकडच्या काळात उदयाला आलेला प्रकार आहे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष जाते. बरेच लोक तिथे जास्त वेळ खर्च करतात. परंतु, ते म्हणजे सर्वस्व नाही, ते म्हणजे वाचन नाही, वाचन हे पुस्तकांचे वाचन आहे आणि पुस्तकांचे वाचन हे दोन्ही प्रकारे होऊ शकतो. डिजिटल स्वरुपात स्टोरीटेलसारखे प्रकार आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ऑनलाईनसुद्धा पुस्तक वाचता येतात आणि प्रत्यक्ष छापलेली पुस्तके सुद्धा विकत घेऊन वाचता येतात. मला येथे नमूद केले पाहिजे विक्रीचे प्रमाण कमी झालेले नाही. आता जर आपण झालेली उत्सव बघितले साहित्य संमेलनात विक्रमी संख्येने पुस्तके विकली गेली, त्यामुळे मराठी माणसाची वाचनाची आवड कमी झालेली आहे, असे कोणी म्हणत असेल तर ते मला तरी मान्य नाही. पुस्तक बऱ्यापैकी लिहिली जात आहेत आणि उत्तम त्यांना प्रतिसाद आहेत आणि आपले लोक हे मराठी पुस्तक जाणिवेने विकत घेऊन आनंदाने वाचत आहेत आणि ते प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रश्न - मराठी जणांना मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल
सुभाष देसाई - मराठी मातृभाषा आहे आणि तिला एक उज्वल परंपरा आहे आणि त्यामुळे तिचा स्वाभिमान आपल्याला आहेच. हा स्वाभिमान आपण जतन केलाच पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. पण, त्याचबरोबर आपली शहर बहुभाषिक होताना दिसत असतात त्या वेळेला आपण मात्र मराठी माणसाने मराठीचा आग्रह आणि हट्ट सोडता कामा नये. एकमेकांशी तर मराठीत बोलले पाहिजे इतर भाषिक आहेत त्यांनासुद्धा मराठीत बोलण्यासाठी सवय लावली पाहिजे. पण, आपण आपला मराठीचा हक्क, आग्रह आणि हट्ट सोडू नये, अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
हेही वाचा - Face to Face Vishwajeet Kadam : 'शिक्षणाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर होणं गरजेचे'