मुंबई - मुंबईसह आगामी राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आता जोरदारपणे उतरणार आहे. महानगरपालिकेमधील रस्ते, पाणी, नालेसफाई, स्वच्छता या सर्व प्रश्नांवर आम्ही रान उठवणार आहे. महागाईच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस अतिशय जोरदारपणे संघर्ष करेल, असा दावाही माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. त्या 'ईटिव्ही भारत'शी बोलत ( Varsha Gaikwad On Mumbai Corporation Election ) होत्या.
'राजकारण हे साधन आहे, साध्य नाही' - वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जनसेवा हा उद्देश घेऊन आम्ही राजकारणात आलो. राजकारण हे साधन आहे, साध्य नाही याची आम्हाला पक्षाकडून आणि कुटुंबाकडून शिकवण मिळाली. मात्र, अलीकडच्या राजकारणात या सर्व गोष्टींना तिलांजली दिली जात आहे. निष्ठा बाजूला सारल्या जात आहे. पण, 'ये पब्लिक है सब जानती है'. राज्यात सध्या राजकारणात अस्थिरतेच वातावरण आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडे आदर्श पणे पहावे, असे लोकप्रतिनिधी आता सापडत नाही. त्यामुळे तरुणांनी कुणाकडे पाहून राजकारणात यावं, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंतही गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
'राजकारणात नीतिमत्ता नाही' - महाराष्ट्रातील राजकारण आतापर्यंत थोडा बहुत फरकाने नितीमत्तेवर चालत आले आहे. पण, अलीकडे राजकारणात नीतिमत्ता शिल्लक राहिलेली नाही. आम्ही जनसेवा हाच राजकारणाचा उद्देश ठेवून राजकारणात आलो होतो. मात्र, अलीकडे केवळ सत्तेसाठी आणि संपत्तीसाठी राजकारणात येत असल्याचे दिसते. वास्तविक राजकारणामध्ये कोणतीही साधन सुचिता शिल्लक राहिलेली नाही. नितीमत्ता लयास गेलेली आहे. एक वेगळी परंपरा सुरू झाल्याचे दुर्दैवाने दिसते. पक्षनिष्ठा आणि विचारधारा यांना पूर्णपणे तीलांजली मिळत असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
'लोकशाहीचा चारही स्तंभांनी आपले कार्य करावे' - लोकशाहीचे चार स्तंभ म्हणजे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा, न्यायपालिका आणि पत्रकारिता. या चारही स्तंभांनी आपापले काम चोख पणे बजावले तर लोकशाही टिकून राहील. अन्यथा, लोकशाही लयाला जाईल. अलिकडे लोकप्रतिनिधी आपला धर्म सोडत आहेत. पत्रकारिता ही भांडवलदारांच्या हातात जात आहे. तर, न्यायपालिकेवरूनही लोकांचा विश्वास उठत चाललेला आहे. या परिस्थितीमध्ये सर्वांना न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता आणि त्यांचे हक्क अबाधित राहिला हवेत. मिळायला हवे. कोणीही कोणाच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. अलीकडे हे हस्तक्षेप फार वाढले आहे. त्यामुळे नेत्यांनीही आत्मचिंतन करावे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे.
'इतिहासाची पुनरावृत्ती होते' - इतिहासाची नेहमी पुनरावृत्ती होत असते. राजकारणातही इतिहासाची पुनरावृत्ती होते. त्यामुळे राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपण भविष्यासाठी काय इतिहास रचून ठेवतो आहोत, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. इतिहासाच्या पायावरच भविष्याची इमारत उभी राहते. त्यामुळे इतिहास उभा करताना तो पारदर्शी आणि स्वच्छ असायला पाहिजे, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - Shiv Sena: शिवसेनेला पुन्हा महाविकास आघाडी शक्य? वाचा, काय आहे विश्लेषकांचे मत