हैदराबाद - नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. या विशेष पर्वावर 'ईटीव्ही भारत'ने 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आपण दररोज विविध क्षेत्रातील नामवंत, कर्तृत्ववान महिलांशी गप्पा करतोय. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्या आपल्या राज्याचं नाव दक्षिणेतील तामिळनाडू या राज्यात गाजवत आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्या कुलकर्णी तामिळनाडू राज्यात दक्षता आणि अॅन्टी करप्शन विभागाच्या प्रमुख आहे. त्यांनी विविध महत्वाची पदे सांभाळली आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्प करणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास...
प्रश्न - तुमचं बालपण आणि शिक्षण हा प्रवास कसा होता?
उत्तर - माझं प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे झालं. त्यानंतर सांगली येथून बीईची डिग्री घेतली. बीईच्या डिग्रीनंतर पुणे विद्यापीठातून सोशल स्टडीज या विषयात पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. त्यानंतर पुण्यामध्ये यूपीएससी परिक्षेची तयारी केली. माझे वडिल बॅकेत होते. मला वाचनाची आवड होती. तसेच पोलीस गणवेशाची आवड होती.
प्रश्न - तुम्ही सांगलीमध्ये कॉम्प्यूटर सायन्स या विषयातून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून सोशल स्टडीजमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. इंजिनियरिंग फिल्डमधून सोशल स्टडीजं या फिल्डमध्ये का यावसं वाटलं.
उत्तर - माझी आधीपासूनचं आयपीएस होण्याची इच्छा होती. क्राईम हे क्षेत्र माझ्या आवडीचं आहे. त्यामुळे ग्रॅज्यूएशन झाल्यानंतर मी यूपीएससी परिक्षेची तयारी करण्याचं ठरवलं. मग मी पुण्यात अभ्यास केला. माझ्या कुटुंबाने यासाठी मला पूर्ण सहकार्य केलं. आणि मी माझ ध्येय गाठलं.
प्रश्न - तुम्ही महाराष्ट्रापासून खूप लांब आहात. तेथील संस्कृती, खाण-पान वेगळं आहे. तुमची महाराष्ट्राशी असलेली नाळ अजूनही कायम आहे... काय सांगाल...
उत्तर - सुरुवातीला एक वर्ष खूप त्रास झाला. त्यावेळी भाषा, खाणं-पीनं, सण-समारंभ, लग्न याविषयी अवघड गेलं. मात्र आता ते अंगवळणी पडलं आहे. परंतु महाराष्ट्राशी नाळ अजूनही कायम आहे. घरी मराठी चॅनल्स बघत असते. बातम्या वाचत असते. कामानिमित्त आपल्या राज्यात जाण-येणं देखील होतं. त्यामुळं आपल्या राज्यानं दिलेली ही शिदोरी माझ्यासोबत आहेत.
प्रश्न - गेली अनेक वर्षापासून तुम्ही पोलीस खात्यात काम करत आहेत. फार मोठी जबाबदार तुमच्यावर आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील काय आव्हानं आहेत, असं तुम्हाला वाटतात...
उत्तर - मी आधी सीबीआयमध्ये काम केलं आहे. भ्रष्ट्राचार सगळीकडे आहे. आमच्याकडे ज्यावेळी तक्रारी येतात तेव्हा याचा व्याप लक्षात येतो. मात्र आम्ही यावर आवर घालण्याचे काम करत असतो. सामान्य माणसाला खूप त्रास होतो. या क्षेत्रामध्ये खरचं मोठं आव्हान आहे.
5 - भ्रष्टाचाराविषयी खूप बोललं जातं. आंदोलनं केली जातात. मात्र, भष्ट्राचाराच्या बातम्या सुरूचं असतात. अनेक अधिकारीही त्या जाळ्यात अडकतात. भष्ट्राचाराला नष्ट करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय असू शकतात...
उत्तर - आम्ही तीन प्रकारच्या केसेस करतो. पदाचा गैरवापर करणं, ट्रॅप आणि बेहिशेबी संपत्ती बागळणे या प्रकरणांमध्ये आम्ही हस्तक्षेप करतो. याशिवाय धाडी टाकण्याचे देखील काम आम्ही करतो. यामुळे भष्ट्राचारावर काही प्रमाणात अंकुश बसला आहे. तसेच समाजात जनजागृती करणे, टीव्हीवरून जनजागृती करणे तसेच इतरही माध्यमातून सामान्य माणसाला अडचणी येऊ नये, यासाठी आम्ही काम करत असतो. त्याचप्रमाणे शाळांमध्ये देखील जाऊन मुलांमध्ये जनजागृती केली जाते.
प्रश्न - मोठ्या पदावर काम करत असताना अनेक अडचणी येतात. बऱ्याचदा वरिष्ठांचा किंवा मंत्र्यांचा दबाव असतो. तुम्हाला कधी असा अनुभव आला का आणि आला असेल तर ती परिस्थिती कशी हाताळली...
उत्तर - अशा घटना फार थोड्या घडतात. माझ्याकडे याविषयीचा वाईट अनुभव नाही आहे. या गोष्टी त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. प्रत्येक व्यक्ती या घटना कशा हाताळतात यावर सगळं अवलंबून असते. अनेक व्यक्तींना अनुभव असल्याने ते परिस्थिती हातळण्यास सक्षम आहे.
प्रश्न - आपले कार्य हे नारीशक्तीला अधिक प्रभावी समाजामध्ये मान-सन्मान मिळवून देणारे आहे... नवरात्रीच्या पर्वावर महिलांना काय संदेश द्याल...
उत्तर - तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे ते तुम्ही करा. हे पुरूषांचं क्षेत्र आहे, हे महिलांसाठी आहे असं नाही. तर आपल्याला जे आवडतं ते करा. तुम्हाला तुमचे कुटंबही साथ देईल. तुम्हाला काय करायचं आहे ते त्यांना समजावून सांगा. मार्ग निघत जातो. स्वत:ची इच्छा असेल तर मार्ग निघेल. तुम्हालाही आनंद होईल. तुमच्यासह कुटंब, समाज आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल. महिलांनी आपल्या इच्छेनुसार आपला मार्ग निवडावा.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या नवदुर्गा : विशेष कार्यक्रमात वैशाली माडेंनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण...