मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या झंझावती सभांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. यावेळेच्या प्रचारात सगळ्यात जास्त गाजलेला वाद म्हणजे ‘तेल लावलेला पैलवान’ कोण? यावरून खूप राजकारण देखील झालं. पण राष्ट्रवादीने राज्यात मारलेली मुसंडी पाहता महाराष्ट्रातील राजकारणाच्या आखाड्यात शरद पवारचं तेल लावलेले पैलवान असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री कोण हे चर्चेनंतर ठरवणार - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते हे भाजप-सेनेत दाखल झाले होते. अगदी पवारांचे जवळचे नातेवाईकही पवारांची साथ सोडून दुसऱया पक्षात गेले होते. त्यानंतरही शरद पवार न खचता त्यातून पुन्हा उभे राहिले, प्रचार केला, महाराष्ट्रभर भिरले आणि आता निकाल आपल्यासमोर आहेतच.
हेही वाचा - सत्तेचा उन्माद जनतेला अमान्य, नव्या पिढीच्या हाती नेतृत्व देणार - शरद पवार
कुस्ती बरोबरीच्या पैलवानांसोबत खेळतात लहान मुलांशी नाही, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह हातवारे करून मुख्यमंत्र्यांवर निशाणाही साधला होता. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरुनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री म्हणाले होते, विधानसभा निवडणूक समोर आली आहे. अशात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र, समोर कोणीही दिसत नाही. शरद पवार यांची अवस्था तर शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ. असं शरद पवार म्हणतात, आणि मागे वळून पाहतात तेव्हा कुणीही नसतं. यावरून देखील शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले होते.
साताऱयात ८० वर्षांचा 'तरुण' पावसात भाषण करतो, ही महाराष्ट्राच्या राजकारणतली मोठी गोष्ट आहेचं. कॅन्सरशी दोन हात केलेल्या माणसांने कशाचीही पर्वा न करता, उभा महाराष्ट्र पालथा घालणं, हे अन्य कुठल्या नेत्याला जमल्याचे सध्यातरी दिसत नाही. अशात निवडणुकीच्या काळात केलेली फडणवीसांची जनआशीर्वाद, आदित्य ठाकरेंची जनादेश किंवा मग राज ठाकरेंचा दोन किंवा फार फार तर चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा, हे पवारांपुढे दुय्यमच ठरले आहे. सातारामध्ये पडत्या पावसात त्यांनी घेतलेल्या सभेमुळे भाजप शिवसेनेच्या प्रचारसभांची धूळदाण उडाल्याचे आजच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते.
हेही वाचा - महायुतीला बंडखोरीचा फटका बसला, सातारा व परळीचा पराभव आमच्यासाठी धक्का - मुख्यमंत्री
शरद पवारांच्या डाव्या पायाला जखम झालेली आहे. त्यांच्या डाव्या पायाचे बोटच तुटलेले आहे. त्यांची सर्जरी झाल्यानंतर या वयात विश्रांती करायची सोडून पवार खऱ्या अर्थाने लढत आहेत. पवारांवर टीका करण्यापलीकडे मोदी-शाहा-ठाकरेंकडे मुद्दे दिसत नसल्याचे त्यांच्या भाषणांमधून दिसत आहे. अशात पवारांनी पडझडीला आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किमान जिवंत ठेवल्याचे आजच्या निकालातून दिसत आहे.
पार्थच्या सपशेल अपयशानंतर रोहित पवारांच्या राजकीय वाटचालीकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. अशात रोहित पवारांचा शानदार विजय हा पवारांच्या दाव्याला खरा ठरवणारा आहे. आता शरद पवार हे नवी पिढी पुन्हा तयार करण्याच्या तयारीत आहेत. दिवाळीनंतर त्यांनी यासाठी पक्षाचा मेळावादेखील बोलावला आहे.