मुंबई - भल्या मोठ्या इमारती, उड्डाण पूल, रस्ते, झोपड्या असं सिमेंटचं जंगल, ही मुंबईची ओळख. पण याच मुंबईत कित्येक एकरांवर वसलेले खरेखुरे जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारची झाडे आहेत. पक्षी-प्राणी आहेत. याची कल्पना फार थोड्या लोकांना होती. पण आज मात्र मुंबईकरच नव्हे, तर देशभरात या जंगलाच्या बातम्या पसरल्या आहेत. आता तर हे जंगल वाचवण्यासोबतच वाढवण्यासाठी जनचळवळ उभी राहिली आहे. हे जंगल म्हणजे आरे जंगल! आणि 'रिवाइल्डिंग आरे' चळवळीमार्फत हे जंगल संवर्धनाचे काम अद्याप सुरू आहे.
तरुण मुलांनी, पर्यावरण प्रेमींनी आरेला वाढवण्यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. तर रिवाइल्डिंग आरेच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांना आरेची सफर करण्यासाठी हातभार लावण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तर ही चळवळ आता आरेला वाचवण्याबरोबरच आरेला वाढवण्याचे काम करेल, अशी आशा यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
अशी सुरू झाली सेव्ह चळवळ
मुंबईत गोरेगाव येथे अंदाजे 3000 एकरवर आरे जंगल वसलेले आहे. या जंगलात 27 आदिवासी पाडे असून शेकडो कुटुंब येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करतात. मात्र या जंगलाकडे मागील काही वर्षांत शासकीय पातळीवर मोठे दुर्लक्ष झाले. अतिक्रमण झाले, झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. तर काही चुकीच्या पद्धतीने विकासही झाला. पण पर्यावरण प्रेमी-अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार खऱ्या अर्थाने आरेवर मोठी कुऱ्हाड चालवण्याचा आणि आरे नष्ट करण्याचा डाव सात-आठ वर्षांपूर्वी आखला गेला. मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ) कारशेड आरेमध्ये बांधण्याचा निर्णय जाहीर झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 2014 मध्ये मुंबईकरांच्या कानावर 'सेव्ह आरे' , 'आरे बचाव' असे शब्द कानावर पडू लागले. नंतर तर सेव्ह आरे, आरे बचाव म्हणत लोकं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू लागली. पुढे ही चळवळ आणखी तीव्र होत यासाठी न्यायालयीन लढाई देण्यात आली. कारशेडनंतर प्राणी संग्रहालय आणि इतर प्रकल्प आणत आरे नष्ट करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप 'सेव्ह आरे'कडून केला जाऊ लागला. पण शेवटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आधी कारशेडचे काम थांबवत पुढे आरेतून कारशेड कांजूर मार्गला हलवले. या निर्णयामुळे आरे वाचले. सर्वसामान्याकडून सुरू झालेली पर्यावरणसंबंधीची चळवळीला काही प्रमाणात यश मिळाले.
...म्हणून 'रिवाइल्डिंग आरे'
सात वर्षांच्या लढाईला अखेर आता यश आले आहे. आरे वाचले आहे. पण आरे वाचले म्हणजे आता पुरे झाले का? असा प्रश्न सेव्ह आरे चळवळीत काही तरुण पर्यावरणप्रेमींना पडला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना 'रिवाईल्डिंग आरे'तून मिळाले. म्हणजेच आरे वाचले खरे, पण आता 'आरेला जपले पाहिजे, वाढवले पाहिजे', असे म्हणत संजीव वलसन या तरुणाने ही संकल्पना पुढे आणली. लॉकडाऊन काळात घरी बसून काय करायचे म्हणत संजीव आपल्या मित्रांबरोबर आरेत जाऊन कचरा साफ करणे, झाडे लावणे, नदीतील कचरा साफ करणे, अशी कामे करू लागला. पुढे आरेतून कारशेड हलवल्यानंतर त्यांनी रिवाइल्डिंग आरेची व्याप्ती वाढवत ही चळवळ जनचळवळ म्हणून उभी करण्याचा निर्णय संजीव यांनी घेतला. जंगल वाढवणे आणि जंगलाबाबतीची माहिती सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचवत त्यांना आरेची ओळख करून देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही जनचळवळ आताच सुरू झाली असून ती पुढे वाढेल आणि आरेही वाढेल असा विश्वास संजीव यांना आहे.
'ट्री वॉक' आणि बरंच काही
संजीव यांनी 'पेड लागओ' या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांबरोबर दर रविवारी आरेत 3 तासांचा एक उपक्रम ही सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना वर्कशॉपसाठी बोलावले जाते. या वर्कशॉपमध्ये ट्री वॉकद्वारे आरेतील झाडांची ओळख करून दिली जाते. पक्षी प्राण्यांची ओळख करून दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे आपण कधीही आयुष्यात न पाहिलेली वा नावं ही कधी न ऐकलेली झाडे, पक्षी प्राणी येथे पाहायला मिळतात. या वर्कशॉपमधे झाडे लावली जातात. तर कुठे कोणती झाडे लावायची इथपासून ती कशी लावायची आणि त्याची देखभाल कशी करायची याची माहिती दिली जात असल्याचे पर्यावरणप्रेमी सृष्टी सोनवणे सांगते. तर झाडे लावण्याबरोबरच प्राणी पक्षी कधी कुठे अडकले, त्यांचा कधी अपघात झाला, आजारी पडले तर त्यांच्या मदतीला आम्ही धावून जातो असे पर्यावरण प्रेमी तरुण राज यादव याने सांगितले आहे.
दरम्यान, आता दररविवारी रिवाईल्डिंग आरेचे वर्कशॉप होणार असून मुंबईकरांना आरेची सफर करता येणार आहे हे विशेष. तर याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. तेव्हा ही जनचळवळ आता मोठी होवो आणि आरे वाचून आरे वाढो, हीच अपेक्षा!