मुंबई - अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) ने प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण राऊत ते शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत आहे. पीएमसी बँक घोटाळ्यासंदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास केला जात असताना यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे.
एचडीआयएल कंपनीचे राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान, पीएमसी बँकेचे एमडी जॉय थॉमस, वरियम सिंग यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 4,355 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यासंदर्भात ईडीकडूनही तपास केला जात होता.
प्रवीण राऊत यांना मिळाले 95 कोटींचे कर्ज , कागदपत्रांची पूर्तता नाही -
ईडीच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासादरम्यान आढळून आले, की पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून प्रवीण राऊत यांच्या नावाने 95 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलेलं होतं. एचडीआयएल कंपनीला 95 कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यात आलेली होती. मात्र हे कर्ज मंजूर करत असताना प्रवीण राऊत व पीएमसी बँकेच्या दरम्यान कुठलीही कागदपत्रांची पूर्तता योग्य प्रमाणात झालेली नसल्याचेही तपासात समोर आलेले आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीला बिन व्याजी कर्ज -
प्रवीण राऊत यांच्या नावावर पालघर येथे जमीन असून प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांना एक कोटी सहा लाख रुपये दिले असल्याचेही समोर आलेला आहे. या मिळालेल्या एकूण रक्कममधील 55 लाख रुपये माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांना देण्यात आल्याचे आढळून आले होतं. 23 डिसेंबर 2010 रोजी 50 लाख रुपये तर 15 मार्च 2011 रोजी 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज माधुरी राऊत यांनी वर्षा राऊत यांना दिल असल्याचं तपासात समोर आलेले आहे. वर्षा राऊत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.
वर्षा राऊत यांना मिळालेल्या रकमेचा वापर हा दादर पूर्व येथील फ्लॅट विकत घेण्यासाठी करण्यात आल्याचेही ईडीच्या तपासात समोर आलेले आहे. माधुरी राऊत, वर्षा राऊत या दोघी अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागीदार असल्याचेही समोर आलेले आहे.
काय आहे प्रकरण -
अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी मुदतवाढ मगितल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा समन्स पाठवले. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 5 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.