मुंबई - राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षांबाबत पालकांच्या मनात संभ्रमावस्था होती. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचं निरसन करत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, अशी महत्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. परीक्षा कालावधीत प्रवासाची अडचण होऊ नये, यासाठी रेल्वेला विनंती केल्याचेही त्या म्हणाल्या.
परीक्षेसाठी अर्धा तास वेळ वाढवली -
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. ८० गुणांची लेखी परीक्षेसाठी याआधी तीन तासाचा वेळ दिला जात होता. मात्र कोविड संकटामुळे दोन्ही वर्गांना ३० मिनिटे अधिक वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही २० मिनिटांचा कालावधी वाढवून दिला जाईल,असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
हे ही वाचा - राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
असे असेल नियोजन -
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे किंवा लॉकडाउन कंटेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यात या परीक्षा घेण्याबाबत नियोजन आखले आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या स्तरावर निश्चित केल्या जातील, अशा गायकवाड म्हणाल्या.
पुरवणी परीक्षा -
परीक्षा मंडळातर्फे आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै व ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. या परीक्षाकरिता शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुका स्तरावर परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा - एनआयए न्यायालयाने वाझेंचे वकीलासंदर्भातील दोन अर्ज फेटाळले
संकेतस्थळावरील माहिती गृहीत धरावी -
परीक्षेसंदर्भात शाळा कनिष्ठ महाविद्यालय केंद्रप्रमुख पर्यवेक्षक व धन्यवाद स्वतंत्र सूचना निर्गमित केल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचना स्वतंत्र निर्णय करण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गोंधळून न जाता राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती ग्राह्य धरावी, असे आव्हान गायकवाड यांनी केल आहे.