मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्री परब यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ही नोटीस आल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. सूडाच्या भावनेतून हे सगळे सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात. दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेच्या नेत्यांना काही दिवसांपासून लक्ष्य केले जात आहे. आम्हाला नोटीस आली तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. शिवसेना हे ईडीचे लक्ष्य आहे. पण त्याचा तसूभरही परिणाम आमच्यावर होणार नाही. अनिल परब कायदा क्षेत्रातले जाणकार अल्याने काय करायचे हे त्यांना माहित आहे.
'कायदेशीर लढा आम्ही देणार'
शिवसेनेतील महत्वाच्या लोकांवर या कारवाया सुरू आहेत. खड्डा जो होतोय त्यात तुम्हीही पडू शकता. अनिल परब यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. कायदेशीर लढा आम्ही देणार आहोत. किरीट सोमय्या यांच्याकडे यादी आहे, तर आमच्याकडेही यादी आहे. आम्ही ही यादी काढू असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
'आम्ही नेहमीच भेटत असतो'
मंत्री अनिल परब यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली होती. फक्त दहा मिनिटात परब हे राऊतांना भेटून निघाले. मात्र, यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले व ते घाईघाईत निघून गेले. अनिल परब आणि मी नेहमी भेटत असतो, यात काही नवीन नाही ते मंत्री आहेत असे राऊत यांनी सांगितले.