मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार म्हणून ओळखल्या जाणार्या मृत इक्बाल मिर्चीच्या संपत्तीवर ईडीने पुन्हा एकदा कारवाई केलेली आहे. ही कारवाई इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबीयांच्या नावावर पाचगणी येथे असलेले सिनेमा हॉल, याबरोबरच मुंबईत असलेले हॉटेल, फार्म हाऊस, दोन बंगले अशा 7 ठिकाणी करण्यात आली आहे. येथे असलेली 22 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - 20 कोटींचे ड्रग प्रकरण उलगडले; छोटा राजन टोळीचा सदस्य निघाला मुख्य सूत्रधार
ईडीने 26 नोव्हेंबर 2019 मध्ये इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबीयांच्या विरोधात अवैध संपत्तीविरोधी कायद्यानुसार (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अॅक्ट) कारवाई केली होती. इक्बाल मिर्चीच्या मृत्यूनंतर त्याची 800 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
या प्रकरणी इक्बाल मिर्ची, त्याची दोन मुले आसिफ मेमन, जुनेद मेमन आणि पत्नी हाजरा मेमन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. इक्बाल मिर्ची याने अंमली पदार्थ तस्करी आणि हवालामार्फत हजारो कोटी रुपयांची संपत्ती भारतात आणि परदेशात जमवलेली होती. त्यावर ईडीकडून आता कारवाई केली जात आहे.
हेही वाचा - बॉलिवूडच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात ड्रग्ज 'नेटवर्क' बनवतेय , भाजपा खासदाराचा आरोप