मुंबई - शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडीने अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्या असून वसुलीतील रक्कम हवालामार्फत त्यात वळविल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. यातील बहुतांश कंपन्याचा वापर काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा केल्याचे गृहीत धरून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय -
अनिल देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाने १३ आणि नातेवाईकांच्या तसेच मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. मात्र, यातील अनेक कंपन्यांमध्ये काहीही व्यवसाय झालेला नाही. मात्र, या कंपन्यांचे अस्तित्व दाखवून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.
ईडीच्या रडारवर या कंपन्या -
मेसर्स राबिया लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स ब्लॅक स्टोन लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स काँक्रीट एंटरप्राइज प्रा. लि., मेसर्स नॉटिकल वेअरहाउसिंग प्रा. लि., मेसर्स पॅराबोला वेअरहाऊसिंग प्रा. लि., मेसर्स बायो-नॅचरल ऑरगॅनिक प्रा. लि., मेसर्स काटोल एनर्जी प्रा. लि., मेसर्स सब्लाइम वेअरहाउसिंग प्रा, लि., मेसर्स विश्वेश लॉजिस्टिक प्रा. लि., मेसर्स अरोमा एंटरप्राइजेस प्रा. लि., मेसर्स मिन्ट्री प्रीमियर लाइफस्टाइल अँड ब्युटी प्रा. लि., मेसर्स मृगतृष्णा ट्रेडिंग प्रा. लि. आणि ट्रॅव्होटेल्स हॉटेल.
ईडीच्या म्हणण्यानुसार -
मेसर्स रिलायबल फायनान्स कॉर्पोरेशन प्रा. लि., मेसर्स व्हीए रियल कॉन प्रा. लि., मेसर्स उत्सव सिक्युरिटीज प्रा. लि. आणि मेसर्स सीतल लीजिंग अँड फायनान्स प्रा. लि. या चार कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत. ज्या केवळ व्यवहारांसाठी तयार करण्यात आल्या होत्या. या चार कंपन्यांचे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन हे बनावट संचालक होते.
अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग शोधला आहे. तो अशा एका व्यक्तीच्या शोधात होता जो देणगी किंवा कर्जाच्या स्वरूपात रोख रक्कम ट्रस्टच्या खात्यात जमा करेल. असे सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. हृषिकेश देशमुख या जैन बंधूंना अगोदरपासून ओळखत होता. हृषिकेश देशमुखच्या सांगण्यावरून हवालाद्वारे नागपूरहून दिल्लीत 04 कोटी 18 लाख रुपये पोहोचले आणि त्यानंतर हृषिकेश देशमुखने बनावट कंपन्या बनवल्या. आणि त्यामार्फत नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थानच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवले. अशाप्रकारे पैशाचे काळ्यातून पांढरे रूपांतर करून ट्रस्टमध्ये कायदेशीर देणगी दिली, असे ईडीचे म्हणणे आहे.
विरोधात नवे पुरावे नाहीत - परमबीर सिंग
मी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. आता त्यासंदर्भात मला आणखी काही पुरावे द्यायचे नाहीत, तसेच उलटतपासणीही करायची नाही, असे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी न्या. चांदीवाल यांना २२ ऑक्टोबरच्या सुनावणीत लेखी कळविले होते. त्यामुळे मला आयोगासमोर साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी, असे सिंग यांनी म्हटले होते. आयोगाने यापूर्वी सिंग यांना सातत्याने साक्षीसाठी समन्स बजावले होते. हजर न राहिल्याबद्दल दंडही ठोठावला होता. त्यामुळे याबाबत आता चांदीवाल आयोग कोणती भूमिका घेतो, यावर राज्य सरकारने सुरू केलेल्या या चौकशीचे भवितव्य ठरणार आहे.
दोन वेगवेगळ्या चौकश्या सुरू -
चांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच अनिल देशमुख यांची ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांमार्फत स्वतंत्रपणे चौकशी सुरू झालेली आहे. त्यातील एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नसल्याचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा - 'तेजोमय प्रकाशपर्व आरोग्य, सुख,समृद्धी घेऊन येवो'