मुंबई - राज्यात कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बातमीमुळे तळीरामांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. आज सकाळ पासूनच पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, कुर्ला याठिकाणी वाईन शॉप्सच्या दुकानात रांग लागली होती. मात्र, काही ठिकाणी दुकाने उघडली नाहीत. यामुळे मद्यप्रेमींची निराशा झाली.
मद्य खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर गर्दी होऊ लागली आहे. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. विक्रोळी येथे सकाळपासूनच वाईन शॉप समोर लोक जमले होते. मात्र, 2 वाजता सुरू होणार 4 वाजता सुरू होईल असे सांगता सांगता दुकान काही चालू झाले नाही यामुळे तळीरामाची निराशा झाली. दुसरीकडे मुलुंडमध्ये वाईन शॉप उघडण्यात आले. तिथे भली मोठी रांग लावण्यात आली होती. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वत:च सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी तर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.