मुंबई - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, न्यायालयात अशितोष श्रीवास्तव यांनी हेमंती कुलकर्णी यांची बाजू मांडली.
काय आहे प्रकरण -
२०१७ मध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१८ रोजी कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती यांना अटक केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता.
हेही वाचा- उसाच्या बिलासाठी थकित शेतकऱ्यांचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर 'अर्धनग्न मोर्चा'