मुंबई - तब्बल 145 कोटी रुपयांचा चीनमधून मागवण्यात आलेल्या इंपोर्टेड मालाचा बनावट चलान बनवून त्याची किंमत कमी दाखवून कस्टम ड्युटी बुडविण्याच्या आरोपाखाली डीआरआय कडून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी डीआरआय कडून नरसीराम चौधरी , कैलाश कुमार माली , जसा राम , सुरेश माली , मालाराम बिश्नोई व विजय या सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे.
या अगोदरही केला होता असा प्रकार -
मुंबई डीआरआय ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून चीनमधून 145 कोटी रुपये किमतीचा इंपोर्टेड माल आरोपींनी भारतात मागवला होता. या मालाची 145 कोटी रुपये किंमत असताना सुद्धा बनावट कागदपत्रांच्या आधारे या मालाची किंमत कमी दाखवण्यात आली होती. ज्यामुळे कस्टम ड्युटीचा भरणा हा योग्य प्रमाणात करण्यात आला नव्हता. या सहा आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता आरोपीनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे . न्यायालयामध्ये आरोपींना हजर केले असता त्यांची रवानगी 17 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने या अगोदर अशा प्रकारचा माल किती वेळा कस्टम ड्युटी चुकवून मागवला आहे याचा तपास सध्या केला जात आहे.