मुंबई - भटक्या कुत्र्यांपासून होणाऱ्या या उपद्रवातून मुंबईकरांची सुटका करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिका प्रत्येक परिमंडळात कुशल मनुष्यबळासह एक अशी सात श्वान वाहने उपलब्ध करणार आहे. यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. ज्यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात येणार असल्याने उपद्रव कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये एका श्वानासाठी ६८० रुपये खर्च येणार आहे. तर संपूर्ण मोहीमेसाठी २ कोटी ३७ लाख ११ हजार ९२० रुपयांचे कंत्राट दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला.
श्वान नियंत्रणासाठी उपाययोजना
भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागाकडून पालिकेच्या हद्दीत फिरणाऱ्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करून पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात येते. २०१४ मध्ये श्वानांची गणना करण्यात आली. यामध्ये मुंबईतील ९५ हजार १७४ भटक्या श्वानांपैकी २५ हजार ९३५ श्वानांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण करण्यात आले नव्हते. यामध्ये १४,६७४ नर ११,२६१ मादी श्वानांचा समावेश होता. निर्बिजीकरण केले नसलेली एक मादी ४ पिलांना जन्म देते. ही पिल्ले वर्षभरात प्रजननक्षम होतात. यामुळेच श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांन्वये वर्षाला ३० टक्के श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिका श्वान नियंत्रणासाठी उपाययोजना करीत आहे. दरम्यान, नव्या ७ श्वान वाहनांबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
श्वान वाहनांची संख्या वाढवणार
पालिकेच्या श्वान नियंत्रण विभागात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत. यातच श्वान पकडण्याबरोबरच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींचा पाठपुरावाही करावा लागतो. याचा परिणाम निर्बीजीकरणाकरिता श्वान पकडण्यावर होतो. सद्यस्थितीत ४ वाहनांमार्फत (पालिकेचे १ व भाडेतत्त्वावरील ३) श्वान पकडण्यात येतात. याशिवाय ३ अशासकीय संस्थांमार्फत श्वान पकडण्याचे काम केले जाते. ही यंत्रणा मर्यादित ठरत असल्याने सातही झोनमध्ये कुशल मनुष्यबळासह प्रत्येकी एक वाहन वाढविण्यात येणार आहे.
या संस्थेला कंत्राट
श्वान नियंत्रणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी आरती कॉर्पोरेशन ही संस्था पात्र ठरली आहे. या संस्थेने प्रती श्वान पकडण्यासाठी ६८० रुपये बोली लावली आहे. या संस्थेला ३४ हजार ९५५ भटके श्वान पकडण्यासाठी २ कोटी ३७ लाख ११ हजार ९२० रुपये दिले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त
महापालिकेच्या श्वान नियंत्रण विभागामध्ये श्वान पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम श्वान पकडण्यासाठी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर होतो. तसेच निर्बीजीकरणासाठी पकडण्यात येणाऱ्या श्वानांवरही होतो. आतापर्यंतची निर्बीजीकरणाची आकडेवारी पाहता अद्याप अशासकीय संस्थांच्या श्वान पकडण्यासोबत अतिरिक्त १७ हजार श्वान दरवर्षी पकडणे आवश्यक आहे. यावरून ७ विभागात ७ वाहने व त्यांना दिवसाचे ८ श्वान प्रति वाहन असे लक्ष ठरवून पुढील दोन वर्षांकरता निविदा मागवण्यात आली आहे. यातील पात्र संस्थेची निवड केली आहे. श्वान पकडण्यासाठी प्रशिक्षित कामगारांसह ही वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून समितीच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे देवनार पशुवधगृह व पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे.
असे करणार काम
- मुंबईत श्वानांची संख्या पाहता प्रत्येक वर्षी ३२ हजार श्वानांचे निर्बीजीकरण, रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात येईल.
- २०१४ पासून २०१९ पर्यंत पालिका आणि अशासकीय संस्थानी एकूण केलेल्या ९०७०३ निर्बिजीकरण, रेबीज लसीकरणाचे प्रमाण पाहता अतिरिक्त १७ हजार श्वान पकडणे आवश्यक आहे.
- यानुसार ७ विभागात ७ वाहने व त्यांना दिवसाचे ८ श्वान प्रतिवाहन ठरवून दिल्यास पालिकेद्वारे सुमारे १७ हजार आणि अशासकीय संस्थाद्वारे १५ हजार असे वर्षाचे एकूण ३२ हजार उद्दिष्ट्य साध्य केले जाणार आहे.
निर्बिजीकरण केलेल्या भटक्या कुत्र्यांची संख्या -
सन २०१४ : ७२३५
सन २०१५ : ६४१४
सन २०१६ : ११,९६५
सन २०१७ : २४,२९०
सन २०१८ : २१,८८६
सन २०१९ : १८,९१२
एकूण : ९०,७०३