मुंबई - मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना पटियाला (पंजाब) येथील थापर इन्स्टिट्युटकडून डॉक्टरेट ही मानाची पदवी आज प्रदान करण्यात आली.मुंबईतील कोरोना महामारी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स (ऑनॉरिस कॉसा) पदवी प्रदान करण्यात आली आहे. इन्स्टिट्युटची 1956 मध्ये स्थापना झाल्यापासून हा मान मिळवणारा मी पहिला माजी विद्यार्थी आहे, अशी भावना पालिका आयुक्त चहल यांनी व्यक्त केली आहे.
पदवी सरकारला समर्पित -
थापर इन्स्टिट्यूट ही अभियांत्रिकी, संशोधन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात अग्रणी आहे आणि जगभरात 25000 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी या संस्थेचे आहेत. तीन दशकांपूर्वी, या संस्थेने 1994 मध्ये आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डॉक्टर ऑफ सायन्सची अशीच पदवी प्रदान केली होती. त्यांच्यानंतर सायन्समध्ये डॉक्टरेट मिळाल्याने मी खरोखरच धन्य आणि सन्मानित झालो आहे. मी हे माझ्या टीम बीएमसी आणि महाराष्ट्र सरकारला समर्पित करतो, असेही पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 'अविध्न' आग प्रकरणी मालक व भाडेकरुंना नोटीस, गुन्हाही दाखल
आयुक्तांच्या या कामाची दखल -
मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर मे महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच प्रवीण परदेशी यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची पालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. पदावर रुजू होताच चहल यांनी मुंबईमधील हॉटस्पॉट, रुग्णालये आणि आयसीयूला भेट देऊन आरोग्य सेवा आणखी चांगली करण्यावर भर दिला होता. डॉक्टर आपल्या दारी, धारावी मॉडेल, ट्रेसिंग टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन रुग्णसंख्या आटोक्यात आणली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजन कमी पडत असताना योग्य नियोजन केल्याने रुग्णांना ऑक्सिजन कमी पडला नव्हता. मुंबई मॉडेलची दखल भारतात व भारताबाहेर घेण्यात आली आहे.