मुंबई - मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण होते. या रुग्णांना बरे करण्याचे काम आमच्या डॉक्टर कर्मचाऱ्यांनी केले आहे. मात्र आता कोरोनावर लस आली असल्याने भीती नाही. आमचे कर्मचारी आणखी जोमाने काम करतील, अशी प्रतिक्रिया राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.
भीती न बाळगता काम
कोरोनाविषाणू विरोधातील लसीकरण आज मुंबईत ९ ठिकाणी सुरू झाले. त्यापैकी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी पहिली लस घेतली. त्याचबरोबर राजावाडी रुग्णालयाच्या अन्य डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी लस घेतली. यावेळी बोलताना, राजावाडी रुग्णालयात कोरोना सेंटर होते. त्यावेळी रुग्णांमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही तमा न बाळगता काम केले आहे. आता लस रूपाने आम्हाला कवच भेटले आहे. यामुळे आता आमचे कर्मचारी आणखी जोमाने काम करू शकतील, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
लस सुरक्षित
लसीबाबत अनेक अफवा पसरत आहेत, या अफवांबाबत बोलताना मी स्वत: लस घेतली आहे. आमच्या इतर कर्मचाऱ्यांनीही लस घेतली आहे. आम्हाला लस घेतल्यावर काहीही झालेले नाही. लस सुरक्षित आहे, इतरांनीही लस घ्यावी, असे डॉ. ठाकूर म्हणाल्या.
१ हजार लोकांना लस
राजावाडी रुग्णालयात एकूण ५ बूथ आहेत. प्रत्येक बुथवर सकाळी १००, दुपारनंतर १०० अशा एकूण २०० जणांना लस दिली जाणार आहे. ५ बुथवर दिवसभरात एकूण १ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे, डॉ. ठाकूर यांनी सांगितले.