मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab malik) आरोपांचा सुरसपाटा लावला आहे. मलिकांनी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक केलेल्या आरोपानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhade) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत कागदपत्रे सादर केली आहेत. याप्रकरणी आज सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान त्यावेळी वानखेडे यांच्याबाबात काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची मुभा मिळावी, अशी विनंती मलिकांच्यावतीने कोर्टात करण्यात आली आहे.
न्यायालयाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे होते आदेश -
समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवताना घोटाळा केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. त्यांचे कुटुंब मुस्लीम असल्याचे व त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे मलिक यांनी निदर्शनास आणले होते. या आरोपामुळे गोंधळ उडाला होता. समीर वानखेडे यांचा नवाब मलिक यांच्याकडून कोर्टात देण्यात आलेला जन्मदाखला आला आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे की पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनीदेखील सोशल मीडियावर समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला आहे. त्यामुळे आता पुन्हा संभ्रम निर्माण झाले आहे. तर मलिक यांच्या या आरोपांविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली. (Dnyandev Wankhede petition against Nawab Malik) यावरुन कोर्टात सुनावणी झाली व कोर्टानं दोन्ही पक्षकारांना आपापल्याला म्हणणे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.
प्रकरणात काय नवीन वळण मिळण्याची शक्यता -
दरम्यान, तत्पूर्वी काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी नवाब मलिक यांनी परवानगी मागितली तर समीर वानखेडे यांना मुंबई महापालिकेने दिलेल्या जन्मदाखल्याची प्रत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे नवाब मलिक यांना सादर करायची असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र, काल नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला न्यायालयात देण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात काय नवीन वळण मिळते, हे पाहावे लागणार आहे. आज न्यायालय आपला यासंदर्भात निकाल देणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.