मुंबई - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यव्यापी बैठकीचे आयोजन आज (गुरूवार) मुंबईत करण्यात आले होते. या बैठकीला चोवीस जिल्ह्याचे मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मराठा समाजाची फसवणूक केली, असा थेट आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. तर 2 सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.
मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पास -
102 वी घटना दुरुस्ती बाबतची चर्चा या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत पास करण्यात आला.
राज्यव्यापी आंदोलन करणार -
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या 2 सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे. तसेच 7 किंवा 8 सप्टेंबरला राज्यव्यापी बैठक घेऊन गणपती विसर्जनानंतर राज्यात एक महामोर्चा काढला जाईल असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न -
राज्य सरकारने नव्याने तयार केलेला राज्य मागासवर्गीय आयोगाचे काही लोक मराठा समाजाच्या विरुद्ध काम करत असल्याची टीका या बैठकीतून करण्यात आली. तसेच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही तो पर्यंत मराठा समाज आता शांत राहणार नाही, असेही यावेळी विनायक मेटे यांनी सांगितले.
हेही वाचा - नारायण राणेंनी अभिवादन केल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण