मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या विषाणूची लागण झालेला मुंबईतील एक रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत या नव्या कोरोना विषाणुचा एकही नवा रुग्ण नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या 6 झाली असून या सहाही जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जानेवारीत 5 रुग्ण
वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार थोडासा कमी होत असतानाच वर्षाच्या शेवटी ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आला. यानंतर खबरदारी म्हणून ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी करून त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवले जात होते. यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे सॅम्पल जिनोम चाचणीसाठी पाठवले जात होते. या चाचणीत 5 जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे जानेवारीमध्ये समोर आले होते. या सर्वांवर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
त्या रुग्णाला डिस्चार्ज
ब्रिटनहून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 90 जणांचे सॅम्पल जिनोम चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. तो रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून मुंबईत नव्या प्रकारच्या कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट, गेल्या 24 तासांमध्ये 8 हजार 998 रुग्णांची नोंद