मुंबई- सतत मुंबईसह राज्य सरकारवर टीका करणारी अभिनेत्री कंगना रणौत अनधिकृत बांधकामामुळे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कंगना रणौतने २०१८ मध्ये घरात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या प्रकरणावर दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कंगनाच्या खार येथील कार्यालयावर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई केली होती.
कंगनाच्या मुंबईतील खार जिमखानाच्या बाजूला असलेल्या डीबी ब्रिज या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या घरामध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. अनधिकृत बांधकामावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी महानगरपालिकेने नोटीस बजावली होती. या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी कंगनाने दिंडोशी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होणार आहे.
येथे आहे अनधिकृत बांधकाम-
मुंबईतील खार जिमखाना येथील डीबी ब्रिज या सोळा मजली इमारतीत कंगनाचे तीन फ्लॅट आहेत. त्यामधील पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये कंगनाने अनधिकृत बांधकाम केल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले होते. त्यानुसार तिला नोटीस बजावण्यात आलेली होती.
काय आहे अनधिकृत बांधकामाचे प्रकरण-
कंगना राहत असलेल्या इमारतीला मुंबई महानगरपालिकेकडून 2014 मध्ये ओसी सर्टिफिकेट देण्यात आलेले होते. त्यानंतर कंगनाच्या घरामध्ये करण्यात आलेल्या बदलांची पाहणी केली असता घरामधील करण्यात आलेले बदल हे अनधिकृत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्याच्याविरोधात कंगनाने 2018 मध्ये दिंडोशी कोर्टामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या नोटिशीच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
कंगना आणि मुंबई महापालिकेत वाद-
अभिनेत्री कंगना राणौतचे अनधिकृत कार्यालय महापालिकेने तोडले होते. यानंतर कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी सरकारी बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. यानंतर शिवसेना आणि कंगनात वादाला सुरुवात झाली. त्यातच पालिकेने कंगनाच्या अनधिकृत मालमत्तेवर बडगा उचलला. हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.