मुंबई - वर्ल्ड हिपॅटायटीस डे निमित्त आज सायन रुग्णालयामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून राष्ट्रीय हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरात हिपॅटायटीस विषाणूमुळे होणाऱ्या आजारपणाला आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूला प्रतिबंध घालण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे पसरणारा आजार आहे. या संसर्गामुळे यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी, इ असे पाच प्रकार आहेत. या आजारामुळे यकृत सुजण्याची शक्यता असते. तसेच मृत्यू देखील ओढावू शकतो. विशेषतः हिपॅटायटिस बी व सी यामुळे हा आजार तीव्र होऊ शकतो. परिणामी त्याचे रुपांतर लिव्हर सिरॉसिस, कॅन्सर यामध्ये होऊ शकते. या आजारावर निदानासाठी देशात सरकारी रुग्णालयात राष्ट्रीय हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम करण्यात येत आहे.
आज या व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्यातीत निदान कार्यक्रमाचे उद्घाटन सायन रुग्णालयात अश्विनी चौबे, राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण भारत सरकार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, डॉ. तात्या लहाने, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग संचालक तसेच इतर चिकित्सक डॉक्टर्स उपस्थित होते.
हिपॅटायटीसचे A,B,C,D आणि E हे प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातील "A" व "E" हे मुख्यतः दूषित पाण्यापासून पसरणारे विषाणू असून हिपॅटायटीस "B" आणि "C" हे मुख्यतः असुरक्षित इंजेक्शन, रक्त संक्रमण, पॅरेंटल ट्रान्समिशन या प्रकारे पसरतो. हिपॅटायटीस "D" हा हिपटायटीस "B" सोबत पसरणारा विषाणू आहे. हिपटायटीस "B" आणि "C" चे विषाणू हे बऱ्याच दिवसांपर्यंत किंवा आयुष्यभर संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात राहू शकतात.
हिपॅटायटीस आजाराचे नियंत्रण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हिपटायटीस नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला असून याचे मुख्य लक्ष्य-
- समूळ उपचार करुन २०३० पर्यंत हिपॅटायटीस "C" चे उच्चाटण साध्य करणे.
- हिपॅटायटीस "A" आणि '' E" मुळे होणारे जोखीम आणि मृत्यू कमी करणे.
याचे मुख्य उद्दिष्ट
- हिपॅटायटीसवरील समाजातील जागरुकता वाढवणे आणि प्रतिबंधक उपाययोजना बाबत जनजागृती करणे.
- आरोग्य सेवेच्या सर्व स्तरांवर व्हायरल हिपॅटायटीस लवकर निदान आणि व्यवस्थापन व्यवस्था तयार करणे.
- हिपॅटायटीस "B" चे लसीकरण अधिक सुदृढ करणे.
- हिपॅटायटीस "B" आणि "C" चे पक्के निदान व उपचार सुविधा सर्वत्र उपलब्ध करणे.
भारत सरकारद्वारे हा कार्यकम देशभर सुरू कण्यात आला आहे, ज्या रुग्णांना हिपॅटायटीसची लागण झाली आहे. ते त्यांच्या जिल्ह्यातच याचा उपचार घेऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये याचे मेन मॉडेल सायन रुग्णालयामध्ये असणार आहे, तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांत सुद्धा यासाठी केंद्राची स्थापना केली जाणार आहे, असे अश्विनी चौबे यांनी सांगितले.