मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'शिंदे सरकार'बाबत आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्री पदाच्या पुढची नव्हती. पण, दिल्ली किंवा नागपूर येथून आदेश आला आणि हा आदेश अखेरचा असल्याने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. माझ्या मते त्यांना देखील त्याची बहुतेक कल्पना नव्हती की ते मुख्यमंत्री होणार आहे, असं पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.
यावेळी पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी ( Devendra Fadnavis as Deputy Chief Minister ) विराजमान झाल्यावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावर खूश नाहीत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. जे मुख्यमंत्री होते. पाच वर्ष काम केले, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केले. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता. पण, एकदा पक्षाने आदेश दिला, की सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते. याचे उदाहरण फडणवीसांनी आज घालून दिले आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणाला माहीत नव्हत्या. पण असे घडले आहे.
"आताचे मुख्यमंत्रीही साताऱ्याचे" - मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो. राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी. तसेच, आताचे मुख्यमंत्री आहेत ते मुळचे साताऱ्याचे आहेत. योगायोग असा आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आता ज्यांनी शपथ घेतली ते साताऱ्याचे आहेत, असे शरद पवारांनी म्हटलं आहे.
"शिवसेना संपुष्टात आली नाही" - उद्धव ठाकरे यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. मोठ्या मनाने त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच आमदारांना बाहेर नेणं हे पूर्व नियोजित होते. तसेच, शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - Eknath Shinde Maharashtra CM : महाराष्ट्राला मिळाले नवे 'ठाणे'दार; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ