मुंबई - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. या अधिवेशनात अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 'राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ४ दिवसात राज्य विकतील', असा टोमणा पवार कुटुंबियांना लगावला होता. पडळकर यांच्या टीकेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ( Deputy CM Ajit Pawar Reply to Gopichand Padalkar )
कोणी काहीही बोलत, चर्चेतून मार्ग काढू
भाजप विधापरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या पवार कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करत आहेत. त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला सुद्धा त्यांनी पवार यांना जबाबदार ठरवले होते. अजित पवार ४ दिवसात राज्य विकतील, असंही पडळकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेताना, “कोणी विधान परिषदेचा सदस्य बोलतो की अजित पवार ४ दिवसात राज्य विकतील. पण राज्य कसं चालवायचं हे आम्हाला कळतं. मी ३० वर्षांपासून आणि बाळासाहेब ३५ वर्षापासून काम करत आहे,” असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटून घेऊन गेलो असतो. पण लोकशाहीची पायमल्ली होता कामा नये. म्हणून विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. लवकरच महाविकास आघाडीतील नेते याबाबत राज्यपालांना भेटून अधिक सविस्तर चर्चा करून त्या चर्चेतून तोडगा निघतो का बघू, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा - No Election Assembly Speaker : अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच
अधिवेशनावर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष होतं -
अधिवेशनाच्या सुरुवातीला चहापानाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजर राहतील ना? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारला होता. त्यावर बोलताना याबाबत, स्टँपवर लिहून देऊ का? असा दावा अजित पवारांनी केला होता. मात्र, आता मुख्यमंत्री हजर न राहिल्याने, कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो, असे अजित पवार म्हणाले. तसेच सुरुवातीला अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन खालच्या आणि वरच्या सभागृहाची पाहणी केली होती. त्यांचं अधिवेशनावर फार बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्याबाबत सूचनादेखील केल्या होत्या. या काळात ज्या दोन कॅबिनेट झाल्या त्यालाही ते व्हीसीद्वारे हजर होते, असेही पवार म्हणाले.
शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते -
आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार होते. पण यंदा अधिवेशनात आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हे २ मंत्री कोरोनाबाधित झाले. त्याचबरोबर ३५ अजून लोक बाधित झाले आहेत. म्हणून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मी व बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून न येण्यास सांगितले, असे पवार म्हणाले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने निर्बंध कडक करावे लागतील -
सध्या राज्यात, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. जनतेला वारंवार विनंती करूनसुद्धा काही जनता सुरक्षेच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष करत आहे. हे जर असेच चालू राहिले तर येणाऱ्या दिवसात याबाबतीत कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.