मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hindutva Hanuman Chalisa) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा (Navneet Rana Ravi Rana at Matoshree) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. त्यासाठी आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच शुक्रवारपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी (PM Modi Mumbai Tour) यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा रवी राणा यांनी केली आहे.
हेही वाचा - Rana Vs Shivsena Live Update : राणांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले....
मागील दोन दिवसात काय घडलं, अगदी थोडक्यात? - चकवा देत राणा दाम्पत्य नागपूर मार्गे गुरुवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले होते. याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. तसेच मातोश्रीला सुरक्षेचे कवच दिले होते. तर काही शिवसैनिक हे राणा यांच्या खार येथील घराबाहेर ठिय्या देऊन होते. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाबाहेर आले होते. मातोश्रीवर कोणाची येण्याची हिंमत नाही. त्यामुळे तुम्ही घरी जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. आज(शनिवार) सकाळी राणा दाम्पत्य यांनी फेसबूक लाईव्ह करत आम्ही मातोश्रीवर येणारच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसैनिक मुंबईतील राणा यांच्या घराबाहेर आक्रमक झाले होते. त्यांनी बॅरिगेट्स तोडत राणा यांच्या घरात येण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच राणा दाम्पत्यांनाि परत अमरावतीला पाठवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर एक Ambulance देखील तैनात केली होती. आज सायंकाळ होताच पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत राणा दाम्पत्यांनी है आंदोलन मागे घेतले आहे.
92 वर्षीय आजीने राणा दाम्पत्यांना 'पुष्पा स्टाईल' दिला इशारा - राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शनिवारी सकाळपासूनच मातोश्री बाहेरही तसेच नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये एक 92 वर्षांच्या आजीही सहभागी झाल्या होत्या. राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी करताना आजीबाईंनी थेट ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये “झुकेगा नहीं साला” म्हणत इशारा दिला. त्या म्हणाल्या, आम्ही हिंदुत्व सोडलेल नाही. आम्ही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे आहोत. आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, आम्ही कडवट हिंदू आहोत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी त्यांना फोन करुन घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला.
काय आहे प्रकरण? - मुंबईत येऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांनी मला मुंबईत कधी यायचे, याची तारीख सांगावी. मी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावणार आहे, मी स्वतः मुंबईची मुलगी असून आज विदर्भाची सून आहे. आज त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असेल, तर माझ्याकडे विदर्भाची संपूर्ण ताकद असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले नाहीतर आम्ही हनुमान जयंती नंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी राणा दाम्पत्य लपून मुंबईत दाखल झाले होते. तसेच येथे पत्रकार परिषद घेऊन आज मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला होता. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळे त्यांना घराबाहेर निघता आले नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत दोघांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.
आंदोलन मागे घेण्यापूर्वी काय म्हणाले राणा दाम्पत्य? - आमदार रवी राणा यांनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, मातोश्रीवर हनुमान चालीसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालीसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचे स्वागत केले असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितले असते, असेही राणा यांनी म्हटले आहे.