मुंबई - मशिदीवरील भोंगे ( Loudspeakers On Mosque ) उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमनंतर ( Raj Thackeray Ultimatum ) आज दुसऱ्या दिवशीही बऱ्याच प्रमाणामध्ये मशिदीवरील भोंग्यावरून पहाटेची अजान ( Morning Azan From Mosque ) झालेली नाही आहे. राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भेटताना दिसत आहे. परंतु जोपर्यंत अनधिकृत भोंगे पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत, हा लढा सुरूच राहणार असल्याचे सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर राजकारण न करता, कुणी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा भानगडीत पडू नये असा इशारा अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना दिला ( Ajit Pawar Warns Raj Thackeray ) आहे. मुंबईत प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत बोलत होते.
कायदा कोणी हातात घेऊ नये : या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येणार नाही,असा नियम आहे. याबाबत आवाजाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेली आहे. ती वाढवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही भावनिक आव्हान व कोणाच्या दबावाला बळी न पडता सर्वांनी व्यवस्थित राहावं. यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. आपण सर्वांना आवाहन केले आहे त्यांनी तशी रीतसर परवानगी घ्यावी व मर्यादेमध्ये भोंगे वाजवावेत. कायदा कोणीही हातात घेण्याच्या भानगडी मध्ये पडू नये,असं महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.
नियम सर्वांना सारखाच लावणार : ईद व अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येईल तेवढा बंदोबस्त सरकारने ठेवला. कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. सर्वांना नियम सारखे आहेत. उत्तर प्रदेश संदर्भातली काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. जहांगिरपुरी येथील जातीय दंगलीनंतर तेथील प्रमुखांनी गोरखपूर येथील मठावरील भोंगे उतरवले. श्रीकृष्ण मठ यावरील भोंगे उतरवण्यात आले. जर आपल्या इथेसुद्धा नियम बनवायचा झाला तर तो सर्वांना सारखाच आहे. म्हणून काही वेळेला आपण त्याच्यामध्ये लोकांच्या मागणीनुसार अटी शर्तींवर थोडी मुभा देतो. तीही सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून. आज शिर्डीत भोंग्यावरून काकड आरती झाली नाही. असे सांगत नियम हे सर्वांसाठी सारखेच असणार आहेत याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला. दोन-तीन दिवसात आवाज कमी झालेले आहेत. मर्यादेचे पालन सर्व करत आहेत. हे एका समाजाचे म्हणून त्यांना नियम होते. दुसऱ्या समाजाचे आहेत म्हणून त्यांना नियम नाही असे करता येत नाही. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीच करण्यात आलं, इतर ठिकाणी नव्हतं. परंतु नियम लावायचा झाला तर, तो सर्वच ठिकाणी समान लावावा लागणार असेही अजित पवार म्हणाले.
ही हुकूमशाही नाही? : याबाबत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, लोकांच्या भावना भडकवणे चुकीचे आहे. सर्व धार्मिक स्थळांना याबाबत नियम पाळावे लागतील. राज ठाकरे यांना औरंगाबाद सभेसाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यातही काही अटींच उल्लंघन झालं आहे. पोलीस त्याबाबत योग्य ती कारवाई करतील. कुणाला त्रास द्यायचं कारण नाही. परंतु कारण नसताना कायदा, नियम मोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अल्टीमेटम देण्याचा तर कोणी प्रयत्न करू नये. ही काही हुकूमशाही नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातील लोकांना अल्टीमेटम द्या. कायदा नियम सर्वांना सारखा आहे मग तो अजित पवार असू दे किंवा सामान्य माणूस. या शब्दात अजित पवारांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
चांगलं नाही झालं तर खापर आमच्यावर : ओबीसी आरक्षण बाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधकांचा हा रडीचा डाव आहे. याबाबत सरकारने भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे.
आम्ही कुठलाही ठराव करताना सर्वांना विश्वासात घेऊन एकमताने ठराव करत असतो. राज्यातील ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व भेटायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दुपारी एक वाजता आघाडीची बैठक लावलेली आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. त्यामध्ये तज्ञांचे काय मत आहे. आता निवडणुका लागल्या तर नेमक्या कधी लागतील. त्याला किती काळ जावा लागेल. हे बघावे लागेल. परंतु शेवटपर्यंत ओबीसी समाजाला न्याय भेटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जात आहे. कालचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याला पाहिजे तसा आला असता तर सर्वजण बोलले असते की, आम्ही सर्व एकमताने ठराव केला म्हणून झालं. चांगलं झालं तर आम्ही सर्वांनी मिळून केलं. चांगलं नाही झालं तर हे सरकारने केलं असं खापर नेहमीच फोडलं जातं. असा टोलाही अजित पवारांनी विरोधकांना लगावला आहे.
तृतीयपंथीही मुख्यमंत्री होऊ शकतो : केंद्रीय राज्य मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी ब्राह्मण मुख्यमंत्री व्हायला हवा असं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावे, कोणीही होऊ शकतो. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो. कुठल्याही जातीची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. ज्याच्याकडे १४५ आमदार निवडून येण्याची क्षमता आहे तो मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले.