मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने इंधनावरचा व्हॅट कमी करून सामान्य जनतेला दिलासा दिला. मात्र काही राज्यांनी इंधनावरचा व्हॅट कमी न केल्यामुळे त्या राज्यातील जनतेला इंधनाच्या दरवाढीला समोर जावे लागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्याचा केंद्राकडे सव्वीस हजार कोटींच्या वर जीएसटी थकले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्राने राज्याचा जीएसटी वेळेत दिल्यास त्याचा चांगला उपयोग करता येईल. पुढील दोन महिन्यात केंद्र सरकारकडे राज्याचा असलेला जीएसटी महाराष्ट्र सरकारला मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आशा व्यक्त केली.
हेही वाचा - Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे
इंधन दरवाढीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा - पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधन दरवाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंधन दरवाढीबाबत कोणताही मुद्दा नाही. मात्र पंतप्रधानांनी काल केलेल्या सूचनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये दरवाढीबाबत चर्चा होऊ शकते. इंधनावरील व्हॅट केंद्र सरकारपेक्षा राज्याचा अधिक आहे. त्यामुळे यामध्ये काही मार्ग काढता येऊ शकतो का? याबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सामान्य नागरिकांवर राज्य सरकारने कोणताही नवीन कर लावलेला नाही. उलट गॅस वरचा टॅक्स राज्य सरकारने कमी केल्यामुळे त्याचा मोठा दिलासा सामान्य नागरिकांना मिळाला असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
केंद्राने इंधनावरील टॅक्स कमी करावे - इंधनावर आधी केंद्र सरकार कर लावतात. त्यानंतर राज्य सरकार आपले कर लावतात. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केल्यास जनतेला आर्थिक दिलासा मिळेल. प्रत्येक वेळी राज्यावर ढकलणे योग्य नाही. महाराष्ट्रातून केंद्राला जास्त टॅक्स मिळतो. मात्र त्यातुलनेत महाराष्ट्राला केंद्राकडून निधी मिळत नाही, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.