मुंबई - महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi government ) मेट्रो ३ प्रकल्पासाठी मुंबईतील आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे कार शेड बनण्याचा निर्णय घेतला. आता राज्यात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने हा निर्णय बदलला. यावर आता पर्यावरणप्रेमी लोकांनी आरे बचाव म्हणत, पुन्हा आंदोलन छेडले आहे. याविषयी बोलताना हे आंदोलन स्पॉन्सर असून छद्दम पर्यावरणवादी लोक ते करत आहेत असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी केला आहे. ते विधानभवनात बोलत होते.
आता एकही झाड कापायची गरज नाही? या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा असला तरी, काही प्रमाणात तो स्पॉन्सर आहे. जिथे सर्वोच्च न्यायालयाने तसेच हरित लवादाने परवानगी दिल्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला असून २५% प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या १ वर्षात काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होऊ शकते. वास्तविक आता या प्रकल्पासाठी झाडे कापण्याची कुठलीही गरज नाही. याबाबत आता कुठलीही झाडे कापली जाणार नाहीत. हा विनाकारण वाद रंगवला जात असून छद्दम पर्यावरणवादी म्हणून आंदोलन केले जात आहे.
नाकापेक्षा मोती जड! मुंबई प्रदूषणामुळे रोज होरपळत चालली आहे. कांजूरमार्गला कारशेट पूर्ण करायला अजून चार ते पाच वर्षे लागतील व हा खर्च १० ते १५ हजार कोटी ने वाढणार आहे. यामध्ये, "नाकापेक्षा मोती जड होणार". आरे जागेत काही प्रमाणामध्ये मागच्या सरकारने नव्याने वन टाकले आहे. आम्ही वनाची जागा सोडून त्या व्यतिरिक्त जागा शोधत आहोत. असेही फडणवीस म्हणाले.
कुहेतुने घेतलेले निर्णय रद्द करणार? महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय सरसकट रद्द करणार का? या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या सरकारने घेतलेले निर्णय आम्ही सरसकट रद्द करणार नाही. जे निर्णय कुहेतूने घेतले असतील, ज्यामध्ये शंका असेल ते निर्णय मात्र रद्द केले जातील. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासंबंधी एम्पिरिकल डेटा तातडीने सादर करायाचा आहे. हा डेटा सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य करून घ्यायचा आहे, म्हणून एम्पिरिकल डाटा लवकरात लवकर तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष हा बहुमताने निवडला जातो म्हणून कुठल्याही पक्षाने अशा प्रकारे काढलेल्या व्हिपला काही अर्थ नसतो, असे सांगत त्यांनी शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हिपवर टोमणा लगावला आहे.
कारशेडच्या जागेचा वाद काय आहे? मुंबईतील आरे येथे मेट्रो कारशेडच्या बांधकामावरून २०१४ पासून वाद सुरू आहे. आरे ते कांजरमार्ग येथील कारशेडचे स्थलांतर हे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादाचे मोठे कारण होते. हे कारशेड कुलाबा-वांद्रे- सिप्झ मेट्रो प्रकल्पाअंतर्गत भूमिगत करण्यात येणार आहे. ३३.५ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाला होता. वास्तविक, गोरेगावची आरे मिल्क कॉलनी हे १८०० एकरात पसरलेले शहरी जंगल आहे. या परिसरात ३०० हून अधिक प्रजातींचे वनस्पती आणि प्राणी राहतात. फडणवीस सरकारने हा प्रकल्प सुरू केला. मात्र, याला शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेची युवा शाखा युवासेना आणि त्यांचे नेते आदित्य ठाकरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचेल, असा युक्तिवाद आंदोलकांनी केला. सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादीही न्यायालयात पोहोचले आहेत.
हेही वाचा - Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षपदाचा पेपर सोप्पा, बहुमत चाचणीचं काय?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
हेही वाचा - Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार