मुंबई - खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. त्यामुळे तीनही पक्षांचे नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील आणि हा निर्णय तिन्ही पक्षाला मान्य असेल, असे अजित पवार म्हणाले आहेत.
'या केवळ राजकीय वावड्या'
राज्यस्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबतची कोणतीही बातमी नसून या केवळ राजकीय वावड्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
'काँग्रेस पक्षात फेरबदल या केवळ चर्चा'
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस पक्षात अनेक फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अशा शक्यतांना अजित पवार यांनी नाकारले आहे.
'अर्थसंकल्पात सर्व खात्यांना न्याय देणार'
काही दिवसात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मात्र कोरोनाकाळात महसुलाची झालेली तूट आणि केंद्राकडून GSTचा परतावा अजून व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक अडचणी असल्याचे ते म्हणाले. मात्र महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व खात्याचे मंत्री यांच्यासोबत चर्चा करून यावर मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.