मुंबई - महाविकास आघाडीने नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपली ताकद दाखवली आहे. ग्रामीण भागात काही आडाखे वेगळे असतात पण महाविकास आघाडीचा विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सत्तेतील घटक पक्ष शिवसेनेसोबत जुळवून घ्या, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पक्षाच्या बैठकीत पवार बोलत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
'महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत सर्वाधिक जागा'
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष आहेत. तीन टर्म या पक्षाने सत्ता मिळवली आहे. पण शिवसेनेच्या समावेशाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार जागा जिंकून आघाडीने आपली ताकद दाखवली आहे. आता स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीतही स्थानिक पातळीवर काही मुद्द्यांवर कदाचित एकमत होणार नाही, पण सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत. या उद्देशाने कार्यकर्त्यांनी काम करावे. जेथे जमेल तिथे शिवसेनेसोबत जुळवून घ्यावे, असे पवार यावेळी म्हणाले.
'शिवसेनेसोबत कायम राहायचे आहे'
महाविकास आघाडीने आपला वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आपल्याला शिवसेनेसोबत कायमचे राहायचे आहे. ज्या प्रकारे विधान परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या एकतेच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले, त्याचप्रकारे आगामी निवडणुकांमध्येही विजय संपादन करायचा आहे. आता आपला प्रतिस्पर्धी कोण, हे आता स्पष्ट झाले असल्याने काम सोपे झाले असल्याचे त्यांनी म्हटले.