मुंबई - पाठीवर 50 किलो ओझे उचलणे अवघड काम आहे. एक टन पोती ट्रकमध्ये भरल्यावर हातात साडेतीनशे रुपये मजुरी मिळते. ही रोजची माथाडी, हमाल कामगारांची स्थिती आहे. संचारबंदीचा फारसा बाऊ न करता त्यांचे काम सुरू आहे. माथाडी कामगारांच्या वर्षानुवर्षांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यातच माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत गृहीत धरले जाते, परंतु त्यांना या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे रेल्वे आणि बसमध्ये प्रवास करता येत नाही. त्यामुळे त्यांची कामावरती येण्याची अडचण निर्माण झालेली आहे. त्यातच भर म्हणजे काम खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे व प्रवासाची अडचण असल्याने दुहेरी मार हा माथाडी कामगार झेलत आहे.
'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात "ब्रेक द चेन" नियमावली जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीची घोषणा केलेली आहे. परंतु कष्टकरी माथाडी कामगारांबाबत मात्र त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात गेल्यावर्षी आणि आत्तासुद्धा जीव धोक्यात घालून राबणाऱ्या या घटकांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा', अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी माथाडी संघटनेचे अध्यक्ष प्रताप मसकर यांनी केली आहे.
माथाडी कामगार आपल्या कामावरती कसे पोहोचणार
गेल्या लॉकडाऊनच्या काळात सुमारे 25 माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला होता. असे असूनही त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत शासनाचा काही निर्णय झालेला नाही. आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्र्यांनी "ब्रेक द चेन" ची घोषणा केली आहे. त्यामध्ये अनेक घटकांना त्यांनी दिलासा देणारी भूमिका जाहीर केली असली तरी, माथाडी कामगारांबाबत मात्र अजूनही निर्णय घेतलेला नाही. माथाडी कामगार हा सुद्धा एक कष्टकरी घटक आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतले असले तरी त्यांना रेल्वे आणि बस मधुन प्रवास करण्याची मुभा अजूनपर्यंत दिलेली नाही. त्यामुळे हे माथाडी कामगार आपल्या कामावरती कसे पोहोचणार, हा मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, अशी मागणी माथाडी कामगारांकडून करण्यात आलेली आहे.
'माथाडी कामगारांना आर्थिक मदतीची गरज'
दक्षिण मुंबई परिसरातील काळबादेवी मार्केटमध्ये अनेक लहान मोठे मार्केट आहेत. या संपूर्ण मार्केटमध्ये काम करणार्या माथाडी कामगारांची संख्या हजारोंमध्ये आहे. सध्या अनेक माथाडी कामगार हे आपल्या गावी देखील परत गेले आहेत. परंतु, जे माथाडी कामगार कामावरती येत आहेत, त्यांना या लॉकडाउनचा खूप मोठा फटका बसत आहे. एकीकडे त्यांच्या हाताला काम नाही, कारण मार्केटमध्ये कोणतीही वस्तू सध्या येत नसल्यामुळे, माल भरण्याचं काम नसल्यामुळे हातात पैसे देखील येत नाही. त्यामुळे अशी दुहेरी संकट या माथाडी कामगारांवर सध्या ओढवलेली आहेत. यासगळ्या माथाडी कामगारांना एक आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात यावी, अशी मागणी माथाडी कामगारांच्या अनेक संघटनांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी पोलिसांच्या ताब्यात